जेव्हा जेव्हा विश्वचषक फायनलसारखे दबावाचे सामना असतात, तेव्हा विराट कोहली टीम इंडियाचा तारणहार म्हणून समोर येतो. T20 विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्येही कोहलीने आपल्या सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत.
टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये कोहलीने आतापर्यंत ७ डावात केवळ ७५ धावा केल्या होत्या, मात्र आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने ५९ चेंडूत ७६ धावांची खेळी करत भारताला संकटातून सोडवले आहे.
भारताने ३४ धावात ३ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ केला आणि भारताला लढण्यासारख्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना जेतेपदाच्या सामन्यात ७ बाद १७७ धावा ठोकल्या. रोहित शर्मा, पंत आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले.
या T20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ३४ धावा होती, जी त्याने बांगलादेशविरुद्ध सुपर-८ सामन्यात केली होती. पण कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासूनच त्याच्यावर विश्वास दाखवला, तो आज किंग कोहलीने सार्थ ठरवला.
अंतिम सामन्यापूर्वी, विराट कोहलीला T20 विश्वचषक २०२४ च्या ७ डावात केवळ ७५ धावा करता आल्या होत्या. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ६८ धावांनी विजय मिळविल्यानंतर रोहित शर्माने सामन्यानंतर विराट हा मोठा खेळाडू असून तो संघाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले होते.
विराट फायनलसाठी आपली मोठी खेळी वाचवून ठेवली आहे, असेही तो म्हणाला होता. आताच या अंतिम सामन्यात रोहितचे भाकीत खरे ठरले आहे. कोहलीने सर्वाधिक गरज असताना ७६ धावा करत टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
विराट कोहली २०११ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळला होता. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोहलीने श्रीलंकेविरुद्ध ३५ धावांची इनिंग खेळली होती. मात्र, अंतिम सामन्यातील गौतम गंभीरची ९७ धावांची खेळी आणि एमएस धोनीची ९१ धावांची खेळी सर्वाधिक लक्षात राहते. पण वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाल्याच्या वेळी कोहलीची ३५ धावांची खेळी खूप महत्वाची होती.
त्यानंतर विराट कोहलीने २०१४ च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्येही अर्धशतक झळकावले होते. विराटने ५८ चेंडूत ७७ धावांची खेळी केली होती. विराट असा खेळाडू आहे, ज्याने आतापर्यंत खेळलेल्या सर्व T20 विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतक ठोकले आहे.
कोहलीला विक्रमांचा बादशाह म्हटले जाते. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्येही त्याने ६३ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. विराटने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम कायम ठेवला आहे.
संबंधित बातम्या