नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली गेली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममधील अनेक वाद समोर आले. पण वादाची सुरुवात मालिकेतील तिसऱ्या कसोटीपासून झाली.
जेव्हा रविचंद्रन अश्विन याने अचानक निवृत्ती घेतली. यानंतर अखेरच्या कसोटी सामन्यात जेव्हा कर्णधार रोहित शर्माला बेंचवर बसवण्यात आले तेव्हा या प्रकरणाला वेग आला. या वादांचा परिणाम भारतीय संघावर स्पष्टपणे दिसून आला. यामुळेच टीम इंडियाला पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१असा दारूण पराभव पत्करावा लागला.
सिडनी कसोटीपूर्वी या मालिकेतील सर्वात मोठा वाद समोर आला, जेव्हा 'इंडियन एक्स्प्रेस' मधील एका बातमीत असा दावा करण्यात आला की संघातील एका वरिष्ठ खेळाडूला कर्णधार व्हायचे आहे. रोहित शर्माच्या खराब कामगिरीची चर्चा होत असतानाच ही बातमी समोर आली.
दरम्यान, कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त करणारा तो खेळाडू कोण होता, हे सांगण्यात आले नव्हते. नावाऐवजी त्याचा खेळाडूला उल्लेख मिस्टर फिक्स इट असा करण्यात आला होता.
या संपूर्ण वादावर पडदा पडत असतानाच माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा याची मुलाखत चर्चेत आली आहे. उथप्पाने या मुलाखतीत मिस्टर फिक्स इट या उल्लेख केला. त्यामुळे मिस्टर फिक्स पुन्हा चर्चेत आला आहे आणि हा मिस्टर फिक्स इट नेमका कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम इंडियात झालेल्या वादावर उथप्पाने मत मांडले. त्याने संघाच्या मिस्टर फिक्स इटवर टीका केली, ज्याने ड्रेसिंग रूममध्ये आपला वैयक्तिक अजेंडा लादण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय तो पुढे म्हणाला की, मी अशा प्रकारची व्यक्ती आहे की, जेव्हा काही घडते तेव्हा मी खुलेपणाने बोलतो. मी संघातील लोकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. पण जेव्हा एखादा दौरा चालू असतो किंवा एखादी स्पर्धा चालू असते तेव्हा मी त्यांच्याशी बोलत नाही कारण प्रत्येक खेळाडूची स्वतःची दिनचर्या आणि मानसिकता असते.
संबंधित बातम्या