Scott Boland Vs Virat Kohli Record : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर संघाच्या टॉप ऑर्डरने लाज आणली. विशेषत: विराट कोहलीसारख्या फलंदाजाने संपूर्ण मालिकेत एकाच पद्धतीने बाद होणे खूपच लाजिरवाणे आहे.
विराट कोहली या सामन्यातही ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर बाद झाला. स्कॉट बोलँड याने विराट कोहलीची शिकार केली. स्कॉट बोलँड हा कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला आहे. विराट कोहलीचा स्कॉट बोलँडविरुद्धचा रेकॉर्डही खूपच खराब राहिला आहे.
विराट कोहली या कसोटी मालिकेत स्कॉट बोलंड विरुद्ध ६ डावात ४ वेळा बाद झाला आहे. जर आपण धावांबद्दल बोललो तर तो बोलंडविरुद्ध केवळ ३२ धावा करू शकला. यामुळेच जेव्हा जेव्हा विराट कोहली बोलंडचा सामना करतो तेव्हा त्याची बॅट चालत नाही. या संपूर्ण मालिकेत विराट कोहली धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूपासून अडचणीत दिसला. यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला कोहली पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. तथापि, तो नशीबवान होता की स्टीव्ह स्मिथने तो झेल पूर्णपणे घेतला नव्हता. त्यामुळे तो थोडक्यात वाचला.
विशेष म्हणजे विराट कोहलीला ज्या चेंडूवर जीवदान मिळाले तो चेंडू स्कॉट बोलंड याचाच होता. मात्र, बोलंडने विराट कोहलीला दुसऱ्यांदा संधी दिली नाही आणि तो पुन्हा एकदा स्लिपमध्ये झेलबाद झाला.
या संपूर्ण मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक केले होते. पण त्यानंतर तो सपशेल अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होण्याचा धोका आहे.
संबंधित बातम्या