Virat Kohli RCB vs KKR : आयपीएल २०२४ चा ३६वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आरसीबीचा अवघ्या एका धावेने पराभव केला.
या सामन्यात केकेआरने प्रथम खेळताना २२२ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला २० षटकात २२१ धावाच करता आल्या. त्यांचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.
पण आता आरसीबी आणि केकेआर यांच्यातील हा सामना वादात सापडला आहे. विराट कोहलीबाबतच्या एका निर्णयावरून क्रिकेट जगतात वादंग सुरू झाला आहे.
केकेआरविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यावर बराच गदारोळ झाला होता. वास्तविक, कोहलीला एका चेंडूवर आऊट देण्यात आले, जो कंबरेच्या वर फेकलेला धोकादायक चेंडू होता. पण तो खरोखर नो-बॉल होता का?
कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने कोहलीला स्लोवर वन फुल टॉस बॉल टाकला. या चेंडूवर कोहली फटका खेळायला गेला आणि झेलबाद झााल. यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केले. कोहलीने रिव्ह्यू घेतला. पण थर्ड अंपायरनेही कोहलीला बाद दिले.
मात्र, अंपायरच्या या निर्णयानंतर कोहली नाराज दिसला. त्यानंतर कोहलीला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचे अनेकांनी म्हटले आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोहलीने रिव्ह्यू घेतला तेव्हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निर्णय अगदी योग्य असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.
जर चेंडू कमरेच्या वर असेल आणि फलंदाज क्रीजमध्ये उभा असेल तर तो नो-बॉल मानला जातो. पण कोहलीच्या बाबतीत असे नव्हते. कोहली शॉट खेळण्यासाठी क्रीज सोडून पुढे आला होता.
टेक्नोलॉजीनुसार राणाचा चेंडू योग्य होता कारण कोहली क्रीजच्या बाहेर उभा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्कही शरीराच्या खूप पुढे झला होता. तंत्रज्ञानाने हे देखील उघड केले की जर कोहली क्रीजच्या आत असता तर चेंडू त्याच्या कमरेपासून ०.९२ मीटर उंचीवर आला असता. कोहलीच्या कमरेची उंची १.०४ मीटर आहे. त्यानुसार हा चेंडू नो-बॉल मानता येत नाही.
ICC नियम ४१.७ नुसार, जर गोलंदाजाने थेट टप्पा पडू न देता फलंदाजाच्या कंबरेच्या वर चेंडू टाकला, तर तो नो-बॉल मानला जाईल. पण, या प्रकरणात हा नियम कोहलीच्या बाजूने गेला नाही. कारण तो क्रीजच्या बाहेर आला होता.