भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीला अनेक मोठे विक्रम रचण्याची संधी आहे.
विराट कोहली इंग्लंडविरुद्ध २ हजार धावा कसोटी पूर्ण करू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला केवळ ९ धावांची गरज आहे. तो हैदराबादमध्येच हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.
विराट कोहली याच्या आधी फक्त ४ खेळाडूंनीच भारत आणि इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध २००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. भारताच्या सचिनने इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या ५३ डावात २५३५ धावा केल्या आहेत.
तर इंग्लंडकडून भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट आघाडीवर आहे. जो रूटने भारताविरुद्ध ४५ डावात २५२६ धावा केल्या आहेत.
या यादीत सुनील गावस्कर यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील गावस्कर यांनी ६७ डावात २४८३ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून या यादीत दुसरे नाव आहे माजी कर्णधार अॅलिस्टर कुकचे आहे. कुकने भारताविरुद्ध ५४ डावात २४३१ धावा केल्या आहेत.
आता या यादीत विराट कोहलीचेही नाव जोडले जाणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ५० डावांमध्ये १९९१ धावा केल्या आहेत.
याशिवाय विराट कोहली आणखी एका पराक्रमात सुनील गावस्करांना मागे टाकू शकतो. घरच्या मैदानावर खेळताना सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध १३३१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने भारतीय भूमीवर इंग्लंडविरुद्ध १०१५ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत विराट कोहलीला या मालिकेदरम्यान सुनील गावस्करचे दोन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे.
एवढेच नाही तर विराट कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म असाच कायम राहिल्यास इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो.