Shreyas Iyer IND vs ENG 2nd ODI : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू श्रेयस अय्यर याने नागपुरात अप्रतिम कामगिरी केली. त्याने स्फोटक अर्धशतक झळकावून भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण तो सुरुवातीला या सामन्याचा भाग होणार नव्हता. विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडल्यानंतर अय्यरला संधी मिळाली होती.
पण आता प्रश्न असा आहे की अय्यर कटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यर खेळणार का? कोहली परतला तर एका खेळाडूला बाहेर बसवावे लागणार आहे.
खरंतर विराट दुखापतीमुळे नागपूर वनडेत खेळला नव्हता. याच कारणामुळे श्रेयसचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. सामन्यापूर्वी अय्यर चित्रपट पाहत बसला होता. पण त्यानंतर अचानक रोहित शर्माने त्याला फोन करून प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यास सांगितले. अय्यरचा प्लेइंग इलेव्हनमधील समावेश भारतासाठी गेम चेंजर ठरला. नागपुरात त्याने ३६ चेंडूत ५९ धावा केल्या.
कोहलीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण कटक वनडेपूर्वी कोहली फिट होऊ शकतो, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. जर ते फिट असतील तर एका खेळाडूला बाहेर बसावे लागेल.
अशा स्थितीत श्रेयस अय्यरला ब्रेक दिला जाऊ शकतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात झाला. टीम इंडियाने हा सामना ४ विकेटने जिंकला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ३८.४ षटकांत पूर्ण केले. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूंचा सामना करत ५९ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे.
संबंधित बातम्या