पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार संपला. त्याच वेळी, आता लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ ची तयारी जोरात सुरू आहे. पुढील ऑलिम्पिक क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास असणार आहे.
वास्तविक, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी यांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत चर्चा केली होती.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश का करण्यात आला, हेही ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी यांनी सांगितले. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यामागील मुख्य कारण म्हणजे विराट कोहलीची लोकप्रियता आहे, असे निकोलो कॅम्प्रियानी यांनी सांगितले. विराट कोहली हा ग्लोबल आयकॉन आहे.
ऑलिम्पिक संचालक निकोलो कॅम्प्रियानी म्हणाले की, जगभरातील सुमारे २.५ अब्ज लोकांना क्रिकेट आवडते. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय खेळाचे ऑलिम्पिकमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्हाला अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे आहे. माझा मित्र विराट कोहली घ्या... तो सोशल मीडियावर जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारा ॲथलीट आहे. लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्स यांच्यापेक्षा जास्त विराट कोहलीला लोक फॉलो करतात.
दरम्यान, क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. मात्र या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकच सामना खेळला गेला. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले नाही.
मात्र, आता तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनामुळे जगभरातील क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत. पॅरिस ऑलिम्पिक संपले आहे. आता जगाच्या नजरा लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ कडे लागल्या आहेत.