Virat Kohli Century : पर्थमध्ये विराट कोहलीचं धमाकेदार शतक, ५०० दिवसांनंतर कसोटीत आली शतकी खेळी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli Century : पर्थमध्ये विराट कोहलीचं धमाकेदार शतक, ५०० दिवसांनंतर कसोटीत आली शतकी खेळी

Virat Kohli Century : पर्थमध्ये विराट कोहलीचं धमाकेदार शतक, ५०० दिवसांनंतर कसोटीत आली शतकी खेळी

Nov 24, 2024 03:07 PM IST

पर्थ कसोटीत टीम इंडियाने आपला दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी शतकं ठोकली.

Virat Kohli Century : पर्थमध्ये विराट कोहलीचं धमाकेदार शतक, ५०० दिवसांनंतर आली कसोटीत शतकी खेळी
Virat Kohli Century : पर्थमध्ये विराट कोहलीचं धमाकेदार शतक, ५०० दिवसांनंतर आली कसोटीत शतकी खेळी (AP)

Virat Kohli Hundred In IND vs AUS 1st Test : पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली याने शतक झळकावले आहे. विराटच्या शतकानंतर भारताने ६ बाद ४८७ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. अशा स्थितीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

विशेष म्हणजे, विराट कोहलीने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शतक झळकावले आहे. चाहते त्याच्या ८१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील ३०वे शतक आहे. यापूर्वी कोहलीने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या बॅटने गर्जना केली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कोहलीने शतक झळकावले. त्याने १४३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

याआधी भारतात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ मध्येही कोहलीने आपल्या बॅटने शतक झळकावले होते. कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे खूप आवडते. सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला केवळ ५ धावा करता आल्या. मात्र त्याने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत तीन अंकी धावसंख्या पार केली. कोहलीने शतक झळकावताच टीम इंडियाने डाव घोषित केला.

टीम इंडियाने डाव घोषित केला

विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करताच भारतीय संघाने डाव घोषित केला. टीम इंडियाने ६ बाद ४८७ धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जैस्वालने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या.  तर केएल राहुलने शानदार खेळी करत ५ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.

डाव घोषित केल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तिसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र सुरू आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे २ दिवसांपेक्षा जास्त वेळ आहे.

Whats_app_banner