टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आपल्या कसोटी क्रिकेटची शेवटची इनिंग खेळली आहे का? किंवा निवड समिती त्याला आणखी एक संधी देऊ शकते. असे अनेक प्रश्न सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर किंग कोहली पूर्णपणे फ्लॉप झाला आहे.
विशेष म्हणजे विराट कोहली या संपूर्ण मालिकेत एकाच पद्धतीने बाद झाला आहे. या मालिकेत विराट आठव्यांदा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला आहे.
यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी विराटवर टीका केली. तसेच, काही माजी क्रिकेट समीक्षकांनी तर विराट हा टेक्निकपेक्षा मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत तो वारंवार त्याच पद्धतीने बाद होत आहे आणि गोलंदाजांनाही विराटला बाद करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज राहिलेली नाही.
पर्थ आणि मेलबर्नमध्ये त्याने थोडीफार चांगली फलंदाजी केली. पण उर्वरित ७ डावांत त्याने केवळ ५४ धावा केल्या आहेत.
दरम्यान, असे असूनही कोहली सध्या निवृत्ती घेण्याच्या मूडमध्ये नाही आणि त्याला २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री वारंवार सांगत आहेत की तो अधिक खेळू शकतो. परंतु काही क्रिकेट एक्सपर्टनी जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी कोहली संघात आपला दावा कशाच्या बळावर मांडणार असा सवाल केला आहे.
एका क्रिकेट एक्सपर्टने म्हटले, की 'आयपीएलमधील कामगिरी किंवा फॉर्मच्या आधारावर रोहित शर्मा किंवा विराट कोहलीची निवड करणे निवडकर्त्यांना कठीण जाईल. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याची निवड कोणत्या आधारावर होणार?
कोहलीचा रणजी करंडक खेळण्याचाही विचार नाही. रणजी ट्रॉफी २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे कोहली आता लंडनमधील त्याच्या नवीन घरात राहतो आणि तो फक्त राष्ट्रीय संघासोबत खेळण्यासाठी किंवा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येतो.
संबंधित बातम्या