Virat Kohli Fight With Australia Fnas : मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. विराट अवघ्या ३६ धावा करून बाद झाला. फलंदाजीत विराट कमाल करू शकला नाही, पण तो राड्यांच्या पीचवर मात्र जोरदार बॅटिंग करत आहे.
वास्तविक, विराट कोहली पुन्हा एका नव्या वादात सापडला आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांशी हुज्जत घातली. मेलबर्नच्या मैदानावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये विराट कोहली काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी आक्रमकपणे बोलताना दिसत आहे.
विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानातून बाहेर पडत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवत त्याला ट्रोल केले. विराट पव्हेलियनमध्ये जात असताना हा प्रकार घडला. चाहत्यांचे वाईट शब्द त्याच्या कानावर पडले, यानंतर त्याने लगेच मागे फिरून ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना याचा जाब विचारला.
कोहली परत बाहेर आला आणि लोकांशी वाद घालू लागला. पण दुसऱ्याच क्षणी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकाने यात हस्तक्षेप करत विराटला आत नेले.
मेलबर्न कसोटीच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली वादात सापडला आहे. पहिल्या दिवशी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कॉन्स्टन्स याला खांदा मारला, त्यानंतर विराटची मॅच फी कापण्यात आली.
यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याला फिल्डिंग करताना डिवचले तेव्हा त्याने त्यांच्या दिशेने च्युइंगम थुंकले आणि आता विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी वाद घातला आहे.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने केवळ ३६ धावा केल्या आणि पुन्हा एकदा त्याच्या जुन्या चुकीमुळे विकेट गमावली. विराटने पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू छेडण्याचा प्रयत्न केला आणि परिणामी तो बाद झाला.
विराट कोहलीच्या विकेटपूर्वी टीम इंडियाने यशस्वी जैस्वालची विकेटही गमावली. जैस्वाल विराटच्या चुकीमुळे धावबाद झाला. जैस्वालने ८५ धावा केल्या. त्याच्या विकेटनंतर टीम इंडियाने पुढील ३ विकेट ६ धावांत गमावल्या. एकूणच दुसरा दिवसही टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक ठरला.
संबंधित बातम्या