रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावत ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात आणला. गेल्या १७ वर्षांत आरसीबी तीन वेळा ट्रॉफीच्या जवळ पोहोचली होती, पण प्रत्येक वेळी त्यांची निराशा झाली. तीनही वेळा आरसीबीचा एकच खेळाडू या पराभवाचा भाग होता आणि तो म्हणजे विराट कोहली. त्यामुळे आरसीबीच्या सर्व खेळाडूंना यंदाच्या सीझनमध्ये विराट कोहलीसाठी ही ट्रॉफी जिंकायची होती. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करून हे दाखवून दिले. सामना संपण्यापूर्वीच विराट कोहलीचे डोळे ओले झाले होते. ट्रॉफी घेऊन विराटने एखाद्या लहान मुलाला हवं ते मिळाल्यासारखं सेलिब्रेशन केलं. आता विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
विराट कोहलीने आरसीबीच्या विजयाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आणि लिहिले की, "या संघाने स्वप्न शक्य केले, हा सीझन मी कधीच विसरू शकणार नाही. गेल्या अडीच महिन्यांत आम्ही या प्रवासाचा खूप आनंद घेतला आहे. हे आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी वाईट काळातही आम्हाला सोडले नाही.
"एवढ्या वर्षांच्या हृदयद्रावक आणि निराशेसाठी हे आहे. या संघाने मैदानावर खेळण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत. आयपीएल ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर, मित्रा, तू मला तुला घेण्यासाठी आणि सेलिब्रेशन करण्यासाठी १८ वर्षे वाट पाहिली आहेस, पण ही प्रतीक्षा पूर्णपणे मोलाची आहे. "
आयपीएल २०२५ फायनलबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाने कोणत्याही खेळाडूचे अर्धशतक न करता २० षटकांत १९० धावा केल्या. विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. पंजाबकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगयांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जला चांगली सुरुवात मिळाली. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांनी पहिल्या विकेटसाठी ५ षटकांत ४३ धावा जोडल्या. यानंतर जोश इंगलिसने ३९ धावांची खेळी केली. पण कर्णधार श्रेयस अय्यर आऊट होताच संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उडाला. शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची खेळी केली, पण त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
संबंधित बातम्या