मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद, टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच असं घडलं!

Virat Kohli : विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद, टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच असं घडलं!

Jun 13, 2024 12:39 PM IST

Virat Kohli Unwanted Records: टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत पहिल्यांदाच असे घडले.

अमेरिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना निराश केले.
अमेरिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना निराश केले. (PTI)

T20 World Cup 2024: अर्शदीप सिंहची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव (नाबाद ५० धावा), शिवम दुबे यांच्या (नाबाद ३१ धावा) संयमी खेळीच्या जोरावर भारताने अमेरिकेवर ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या सुपर-८ मध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.

अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकचा शिकार ठरला. टी-२० विश्वचषकात विराट पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. त्याला अमेरिकेच्या सौरभ नेत्रावलकरने बाद केले. सौरभ नेत्रावळकर या विश्वचषकात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. तो आपल्या गोलंदाजीत सातत्य राखत संघाच्या यशात मोठे योगदान देत आहे. सौरभ नेत्रावलकर हा भारताचा आहे. त्याने भारताकडून अंडर- १९ विश्वचषकही खेळला आहे. अमेरिकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता.

ट्रेंडिंग न्यूज

अर्शदीपची भेदक गोलंदाजी

नासो काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेची फलंदाजीची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि त्यांनी पहिल्या तीन धावांत दोन विकेट गमावल्या. अर्शदीपने शायन जहांगीर (शून्य धाव), आंद्रियास गौस (२ धावा) यांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर स्टीव्हन टेलर आणि कर्णधार अॅरॉन जोन्स यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आठव्या षटकात हार्दिक पांड्याने आरोन जोन्सला (११ धावा) बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. नितीश कुमारने २३ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. पण त्यालाही अर्शदीपने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कोरी अँडरसन (१५ धावा), हरमीत सिंह (१० धावा) आणि जसदीप दोन धावा करून बाद झाला. शॅडली व्हॅन शाल्कविक ११ धावांवर नाबाद राहिला. अमेरिकेने निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावून ११० धावा केल्या.

सूर्यकुमार आणि दुबेची दमदार फलंदाजी

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने १५ धावांवर आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. विराट कोहली (शून्य), रोहित शर्मा ३ धावांवर बाद झाला. दोन्ही फलंदाजांना सौरभ नेत्रावळकरने बाद केले. रिषभ पंत (१८ धावा) आठव्या षटकात तिसरी विकेटच्या रुपात बाद झाला, त्याला अलीने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी डाव सांभाळत संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद (५०) धावा केल्या. तर शिवम दुबेने नाबाद ३१ धावांची खेळी केली. दोन्ही फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी झाली. भारताने १८.२ षटकांत ३ विकेट्स गमावून १११ धावा केल्या आणि हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या गडी बाद केले. अली खानने एका फलंदाजाला बाद केले. अर्शदीप सिंहला त्याच्या शानदार खेळासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

WhatsApp channel
विभाग