टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचा खराब फॉर्म त्याची पाठ सोडायला तयार नाही. रणजी ट्रॉफीमध्येही विराट कोहलीची अवस्था वाईट आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (३१जानेवार) स्टार फलंदाज विराट कोहली ६ धावा करून बाद झाला.
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये परतला, मात्र त्याच्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा केली आहे. विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळतो आणि त्याने दिल्लीसाठी शेवटचा रणजी सामना नोव्हेंबर २०१२ मध्ये गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता.
विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर परतला आहे, कारण बीसीसीआयच्या धोरणानुसार भारतीय खेळाडूंनी शक्य असेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे.
विराट कोहली दिल्लीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि १५ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. रेल्वेचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने विराट कोहलीला आपला बळी बनवला.
रेल्वेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवान याच्या चेंडूने विराट कोहली चकित झाला. हिमांशू सांगवानच्या चेंडूने विराट कोहलीचा ऑफ स्टंप उडवला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही कोहली प्रत्येक डावात ऑफ-स्टंपवरील चेंडूवर बाद होत होता. पण या डावात एक बदल झाला, यावेळी तो बोल्ड झाला.
हिमांशू सांगवानने चेंडू ओव्हर द विकेटवरून ऑफ स्टंपवर टाकला. या चेंडूवर विराट कोहली पूर्णपणे बीट झाला आणि चेंडू बॅट पॅडमधून ऑफ स्टंपवर आदळला.
हिमांशूने ही विकेट जल्लोषात साजरी केली. त्याची आक्रमकता पाहण्यासारखी होती. विराट झाल्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना प्रचंड निराशेचा सामना करावा लागला. कोहली बाद झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी स्टेडियम सोडण्यास सुरुवात केली.
संबंधित बातम्या