टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट कोहली एका बेटिंग ॲपला सपोर्ट करताना दिसत आहे.
दरम्यान, विराट कोहलीआधी अभिनेत्री रश्मिका मंदाना, सचिन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर हेदेखील डीपफेक व्हिडीओचे शिकार झाले होते.
आता या डिजिटल स्कॅमर्सनी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून विराट कोहलीची बनावट जाहिराती तयार केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कोहली हिंदीत बोलताना आणि बेटिंग ॲपला सपोर्ट करताना दिसत आहे. व्हिडिओ अधिक खरा दिसावा आणि वाटावा यासाठी निर्मात्यांनी फुटेजमध्ये एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराचा समावेश केला आहे.
तसेच, ही जाहिरात एका लाईव्ह न्यूज सेगमेंटचा भाग आहे, असे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोबतच या जाहिरातीत दावा करण्यात आला आहे, की कोहलीने कमीत कमी गुंतवणुकीतून मोठी कमाई केली आहे.
स्कॅमर्सनी कोहलीची मुलाखत बदलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कोहलीच्या खऱ्या आवाजाच्या जागी बनावट आवाज दिला आहे. यामुळे तो ऑनलाइन गेमला मान्यता देत असल्याचा भ्रम निर्माण झाला. कोहलीने अशा खेळांचे कधीच समर्थन केले नाही.
डीपफेक हा शब्द पहिल्यांदा २०१७ मध्ये वापरला गेला. त्यावेळी अमेरिकेतील एका सोशल साइटवर सेलिब्रेटींचे असे अनेक डीपफेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. यात एम्मा वॉटसन, गॅल गॅडॉट, स्कार्लेट जॉन्सन या अभिनेत्रींचे अनेक पॉर्न व्हिडिओ होते.
खऱ्या व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओमध्ये दुसऱ्याचा चेहरा, आवाज आणि हावभाव फिट करणे याला डीपफेक म्हणतात. हे इतके स्पष्टपणे घडते की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकेल. यामध्ये नकलीदेखील अगदी खऱ्यासारखे दिसते. यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाते. यामध्ये तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जातात.
संबंधित बातम्या