टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली गेल्या काळापासून वाईट फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो सुपर फ्लॉप झाला. यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो फॉर्मात कसा परत येतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशातच आता, सुत्रांच्या माहितीनुसार विराट कोहली रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत खेळताना दिसू शकतो. असे झाल्यास विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळताना दिसेल.
रणजी ट्रॉफीत एलिट ग्रुप डी मध्ये दिल्लीचा सामना सौराष्ट्राविरुद्ध होणार आहे. हा सामना २३ जानेवारीपासून राजकोट येथे खेळला जाईल. या सामन्यापूर्वी विराट दिल्लीच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. पण क्रिकबझच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यासाठी अधिकृतपणे त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केलेली नाही.
तथापि, या वृत्तात असाही दावा करण्यात आला आहे की विराट "राजकोटमध्ये दिल्ली संघात सामील होईल आणि संघासोबत सराव करेल. तो सामना खेळेल का नाही याची स्पष्ट माहिती नाही. जर त्याने सामना खेळला तर तो २०१२ नंतर रणजी क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीची बॅट शांत राहिली. एक डाव सोडला तर त्याला विशेष काही करता आले नाही. विराट कोहलीने ५ कसोटीच्या ९ डावात १९० धावा केल्या होत्या. या काळात त्याची सरासरी २३.७५ होती. विराटने संपूर्ण मालिकेत १५ चौकार आणि २ षटकार मारले होते.
विराट कोहलीच्या रणजी ट्रॉफीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत २३ डावात १५७४ धावा केल्या आहेत. २००९-१० च्या मोसमात विराटची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने ३ सामन्यात ३७४ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने २००६ मध्ये देशांतर्गत रेड बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
संबंधित बातम्या