या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. या विक्रमाद्वारे किंग कोहली भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडणार आहे. कोहलीला इतिहास रचण्यासाठी फक्त ५८ धावा करायच्या आहेत.
अवघ्या ५८ धावा केल्यानंतर किंग कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७,००० धावा पूर्ण करेल. विशेष म्हणजे विराट केवळ या आकड्याला केवळ स्पर्श करणार नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७ हजार धावा करणारा फलंदाज बनणार आहे. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
दिग्गज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ६२३ डावांमध्ये २७ हजार धावा करण्याचा टप्पा गाठला होता, तर कोहलीने आतापर्यंत ५९१ आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत.
अशा परिस्थितीत, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्याकडे बरेच सामने आणि डाव आहेत, ज्यामध्ये त्याला फक्त ५८ धावा करायच्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २६९४२ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० फलंदाजांची यादी पाहिली तर विराट कोहली हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे.
या यादीत सचिन तेंडुलकर ३४३५७ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा २८०१६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग २७४८३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर किंग कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत ११३ कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांच्या १९१ डावांमध्ये त्याने ४९.१५ च्या सरासरीने ८८४८ धावा केल्या आहेत. यात दरम्यान बॅटमधून २९ शतके आणि ३० अर्धशतके झाली आहेत.