लंडनहून परतलेला विराट कोहली पूर्णपणे ताजातवाना दिसत आहे. चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी किंग कोहलीने पूर्ण तयारी केली आहे. चेपॉक स्टेडियमवर रविवारी (१५ सप्टेंबर) झालेल्या सराव सत्रात सुपरस्टार फलंदाजाने असा फटका मारला की थेट भिंतीला छिद्र पाडले.
होय! सराव सत्रादरम्यान, विराटने मारलेला एक शक्तिशाली शॉट ड्रेसिंग रूमच्या भिंतीवर आदळला आणि तेथे बॉलच्या आकाराचे छिद्र पडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ Jio Cinema या अधिकृत प्रसारकांनी अपलोड केला आहे. यावरून विराट पूर्णपणे लयीत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे नजमुल हसन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी संघाला भारतीय दौरा चांगलाच कठीण जाणार आहे. पण येथे येण्याआधी बांगलादेशने पाकिस्तानी संघाला २-० असे कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला असेल.
बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आहे. पाकिस्तानात जाऊन बांगला टायगर्सने पाकिस्तानला धुळ चारली. तसेच, त्यांनीपरदेशी भूमीवरील पहिली कसोटी मालिकाही जिंकली.
बांगलादेशने आतापर्यंत भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण यंदा ते जोशात आहेत. अशा स्थितीत टीम इंडिया त्यांना हलक्यात घेण्याची चुक करणार नाही.
त्यांच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतात. भारताने २०२४ च्या सुरुवातीला शेवटची कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये रोहित शर्माच्या संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला.
भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. ५ कसोटी सामन्यांची मालिका ही भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळांसाठी बहुप्रतिक्षित मालिका आहे.