आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी (११ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने बंगळुरूचा एकतर्फी धुव्वा उडवला.
या दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या जेव्हा फलंजाजीसाठी मैदानात आला, तेव्हा त्याला वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला. चाहत्यांनी हार्दिकच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
पण यावेळी आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वानखेडेवरील प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्याने प्रेक्षकांना इशारा करत हार्दिकला सपोर्ट करण्याचा इशारा केला. विराट कोहली प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करत असल्याचा व्हिडीओ काही क्षणातच प्रचंड वेगाने व्हायरल झाला.
दरम्यान, या सामन्यात हार्दिक पंड्याने तुफानी खेळी केली. त्याने अवघ्या ६ चेंडूत २१ केल्या. त्याने या खेळीत ३ षटकार मारले.
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९६ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने तुफानी फलंदाजी केली. त्यांनी अवघ्या ८ षटकात १०० धावा फलकावर लावल्या. यानंतर १२व्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर पंड्या फलंदाजीला आला, पण चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
पण आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला प्रेक्षकांची ही वृत्ती आवडली नाही. त्याने प्रेक्षकांना हातवारे करत हार्दिक पंड्याला सपोर्ट करण्याचे आवाहन केले.
यानंतर पंड्याने अवघ्या १५.३ षटकांत सामना संपवला. मात्र, मुंबईच्या विजयापेक्षा विराट कोहलीच्या या कृतीचे जास्त कौतुक केले जात आहे. कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत विरोधी कर्णधाराला सन्मानाने वागवण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी पहिले ३ सामने गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. आता त्यांनी सलग दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्लीला पराभूत केल्यानंतर, मुंबईने गुरुवारी आयपीएल २०२४ च्या २५ व्या सामन्यात आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला.
आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स आता सातव्या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीचा ६ सामन्यांमधला हा पाचवा पराभव असून ते पॉइंट टेबलमध्ये ९व्या स्थानावर आहेत.
संबंधित बातम्या