Virat Kohli Retirement From T20 Cricket : टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला आहे. या सामन्यात विराट कोहलीने ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, मात्र सामन्यानंतर झालेल्या प्रझेंटेशन सेरेमनीमध्ये कोहलीने हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले.
फायनल जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, 'हा माझा शेवटचा टी-२० विश्वचषक होता, आम्हाला हेच साध्य करायचे होते. एके दिवशी तुम्हाला असे वाटते की तुम्ही आता धावा करू शकत नाही आणि ती फक्त एक वेळ असते, ती आता आली आहे. भारतासाठी हा माझा शेवटचा टी-२० सामना होता. आम्हाला तो कप उचलायचा होता.
कोहली म्हणाला, 'हो, मी जिंकलो, हे उघड आहे. पण मी हरलो असतो तरी हे जाहीर करणारच होतो. पुढच्या पिढीने T20 खेळ पुढे नेण्याची वेळ आली आहे. आयसीसी टूर्नामेंट जिंकण्यासाठी खूप वर्ष लागली. तुम्ही रोहितसारख्या खेळाडूकडे पहा, तो टी-२० ९ विश्वचषक खेळला आहे आणि हा माझा सहावा आहे. तो त्यास अगदी पात्र आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी खेळता आली नाही. पण त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला सामन्यात परत आणले.
अक्षर पटेलने ३१ चेंडूत ४७ तर विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. शिवम दुबेने १६ चेंडूत २७ धावांची खेळी करत भारताला १७६ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. भारताकडून गोलंदाजी हार्दिक पंड्याने ३ विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.