Virat Kohli Angry Reaction Rajat Patidar : आयपीएल २०२५ मध्ये गुरुवारी (११ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीला दारुण पराभव पत्करावा लागला.
दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सने पराभव केला. बंगळुरू १६४ धावांच्या लक्ष्याचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्लीची टॉप ऑर्डर उद्धवस्त करून दमदार सुरुवातही केली होती.
पण दिल्ललीच्या केएल राहुलची ९३ धावांची नाबाद खेळी आरसीबी संघासाठी खूपच वेदनादायी ठरली. केएल राहुलने एकहाती संघाला विजय मिळवून दिला.
दरम्यान, आरसीबीच्या या पराभवानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली संघाचा मेंटॉर दिनेश कार्तिक याच्याशी संतापच्या भरात बोलताना दिसत आहे. यामुळे आरसीबी संघात सर्व काही ठीक नसल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १६ व्या षटकातील आहे. केएल राहुलने या षटकात आक्रमक पद्धतीने फटके मारण्यास सुरुवात केली, त्यानंतर विराट कोहली आरसीबीचा फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिकशी रागाने बोलताना दिसला. या व्हिडिओमुळे कोहली बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारवर खूश नसल्याच्या अटकळांना उधाण आले आहे.
हिंदी समालोचनामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग म्हणाले की, जर विराट कोणत्याही निर्णयावर नाराज असेल तर त्याने कर्णधार पाटीदारशी त्याबद्दल बोलले पाहिजे.
मैदानावर घेतलेल्या काही निर्णयांमुळे विराट कोहलीने केवळ दिनेश कार्तिकशीच नव्हे तर भुवनेश्वर कुमारशीही बोलल्याचा दावा एका चाहत्याने सोशल मीडियावर केला. दुसऱ्या स्ट्रॅटेजिक टाइम-आउटमध्ये विराटही संघात सामील झाला नाही. पण विराट का संतापलेला होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, केएल राहुल ह दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ५३ चेंडूत ९३ धावांची शानदार खेळी केली, त्यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ६ षटकारही मारले. राहुलने आतापर्यंत ३ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या