भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना २४ ऑक्टोबरपासून खेळला जाईल.
पण याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग ६ विजयानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र बंगळुरूत झालेल्या या कसोटीत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आणि न्यूझीलंडने हा सामना ८ विकेटने जिंकला.
दरम्यान, आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईत कृष्ण दास कीर्तनाला उपस्थिती लावली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करवा चौथच्या निमित्ताने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईत एकत्र आले होते, मात्र यावेळी त्यांनी करवा चौथचा उपवास करण्याऐवजी एका खास पूजेत भाग घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रसिद्ध कृष्णदास कीर्तन होते, ज्यामध्ये विराट आणि अनुष्का सहभागी झाले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अनुष्का एका सुंदर पांढऱ्या पोशाखात दिसत आहे, तर विराटने कॅज्युअल कपडे घातले होते आणि तो खूपच प्रसन्न दिसत होता.
व्हिडिओमध्ये ते दोघे कीर्तनादरम्यान मंत्रमुग्ध झालेले दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये अनुष्का तिथे होत असलेले कीर्तन गातानाही दिसली. या दृश्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
भारताने आतापर्यंत पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन कसोटी सामने खेळले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, २०१९ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवला होता.