virat kohli century vs new zeland world cup 2023 : विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट करिअरचे विक्रम शतक झळकावले आहे. त्याने आज न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात ५० वे वनडे शतक ठोकले. या शतकासह विराटने वनडे क्रिेकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांची नोंद होती. आता विराटने आज ५० वे शतक करून सचिनला मागे टाकले आहे.
विराटने २९१ सामन्यांच्या २७९व्या डावात आपले ५० वे शतक पूर्ण केले तर सचिनला ५० शतकांपर्यंत पोहोचण्यासाठी ४५२ डाव लागले.
विराट या सामन्यात ११३ चेंडूत ११७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार लगावले. विराटला टीम साउथीने डेव्हॉन कॉनवेच्या हाती झलेबाद केले.
काही दिवसांपूर्वी विराटने त्याच्या ३५व्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९वे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. यानंतर त्याला ५० वे शतक पूर्ण करण्यासाठी फक्त १० दिवस लागले आहेत तर सचिनला ४८ ते ४९ शतकाचा आकडा गाठण्यासाठी ३६५ दिवस लागले होते.
५०- विराट कोहली
४९ - सचिन तेंडुलकर
३१ - रोहित शर्मा
३० - रिकी पाँटिंग
२८ - सनथ जयसूर्या
या सामन्यात विराटने आणखी एक महापराक्रम केला आहे. विराटने या विश्वचषकात आतापर्यंत ६७३ हून अधिक धावा केल्या आहेत आणि तो आता एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा २० वर्ष जुना विक्रम मोडला. सचिनने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध आपली ८१वी धावा करताच मास्टर ब्लास्टरला मागे सोडले. अशाप्रकारे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने अव्वल स्थान पटकावले.
संबंधित बातम्या