Virat Kohli RCB vs KKR : आयपीएल २०२४ चा ३६वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आरसीबीचा अवघ्या एका धावेने पराभव केला.
या सामन्यात केकेआरने प्रथम खेळताना २२२ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला २० षटकात २२१ धावाच करता आल्या. त्यांचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.
दरम्यान, या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने एक मोठा विश्वविक्रम केला आहे. विराट कोहली या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही, पण बाद होण्यापूर्वी त्याने एक असा पराक्रम केला जो टी-20 क्रिकेटच्या इतिहासात अन्य कोणताही खेळाडू करू शकला नाही.
T20 क्रिकेट मधील सर्व स्फोटक फलंदाजांना मागे टाकत विराट एका खास यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या सामन्यात विराट कोहलीने ७ चेंडूत १८ धावांची खेळी केली. यादरम्यान विराटने १ चौकार आणि २ षटकार मारले. या षटकारासह त्याने आयपीएलमध्ये २५० षटकार पूर्ण केले.
त्याच वेळी, त्याच्या नावावर आता आरसीबीसाठी २५० षटकार आहेत. यासह, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघासाठी २५० षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने एका संघासाठी इतके षटकार मारले नव्हते.
आयपीएलमध्ये २५० षटकार मारणारा विराट कोहली हा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्स यांनी हा पराक्रम केला होता. या यादीत ख्रिस गेल ३५७ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत २७५ षटकार मारले आहेत आणि एबी डिव्हिलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २५१ षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे, एमएस धोनी आयपीएलमध्ये २५० षटकार मारण्यापासून ३ षटकार दूर आहे.
२५० - विराट कोहली - आरसीबीसाठी
२३९ - ख्रिस गेल- आरसीबीसाठी
२३८ - एबी डिव्हिलियर्स- आरसीबीसाठी
२२४ - रोहित शर्मा- मुंबई इंडियन्ससाठी