IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात बुधवारी आयपीएलचा १६वा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याने १०६ धावानी विजय मिळवला. मात्र, सोशल मीडियावर दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या यार्करचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात इशांतने कोलकात्याच्या स्फोटक फलंदाज आंद्रे रसलला गुडघे टेकायला लावले.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याच्या संघाने २० षटकात सात विकेट गमावून २७२ धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात २७७ धावांचा डोंगर उभा केला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाचा मान मिळवला.
कोलकाताच्या डावातील २० व्या षटकात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने इशांत शर्माच्या हातात चेंडू सोपवला. इशांतने षटकातील पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला, जो खेळताना रसल जमीनीवर कोसळला. इशांतने टाकलेल्या यॉर्कर रसलला समजण्याआधीच तो बोल्ड आऊट झाला. इशांतच्या चेंडूचे स्वत: रसलने कौतूक केले. या सामन्यात रसलने १९ चेंडूत ४१ धावांची वादळी खेळी केली. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशांतने रमनदीपला आऊट केले. त्याने फक्त दोन धावा केल्या.
आयपीएल २०२४ च्या १६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत सात विकेट्स गमावून २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १७.२ षटकांत १६६ धावांवर गारद झाला. दिल्लीचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे. यासह कोलकात्याने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.
या विजयासह कोलकात्याचा संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर, दारुण पराभवानंतर दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीचे दोन गुण आहेत.कोलकात्याला त्यांच्या पुढच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जशी खेळायचे आहे, जो सामना ८ एप्रिल रोजी चेन्नई येथे खेळला जाणार आहे. तर, दिल्ली त्यांच्या पुढच्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. हा सामना ७ एप्रिलला वानखेडेवर खेळला जाणार आहे.