New Zealand and Sri Lanka: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रचा अफलातून झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडच्या डावातील २३ व्या षटकात वानिंदू हसरंगा गोलंदाजी करत होता.हसरंगाने या षटकातील अखेरचा चेंडू ऑफ-स्टंप लाईनवर टाकला. त्यानंतर रवींद्रने बॅकफूटवर जाऊन चेंडू मारला. मात्र, समोर उभा असलेल्या चरिथ असलंका हवेत उडी घेत झेल पकडला. हे पाहून रचिन रवींद्र आश्चर्यचकीत झाला. चरिथ असलंका फिल्डिंगचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कारण रचिन रवींद्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. तो आणखी काही षटक खेळला असता तर, त्याने श्रीलंकेसमोर मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभारला असता, अशी शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे, रवींद्र रचिंद्र युवा खेळाडू असला तरी त्याची जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये गणना केली जाते.
या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात गेलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विल यंग स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र यांच्यात ११२ धावांची अप्रतिम भागीदारी झाली. रवींद्रने आपले अर्धशतक झळकावून संघाचा डाव पुढे नेला. मार्क चॅपमन बाद झाल्यानंतरही तो एका बाजूने झुंज देत होता. मात्र, डावातील २३व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर वानिंदू हसरंगाने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला, ज्यात चरिथ असलंका सिंहाचा वाटा होता.
श्रीलंकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, दुसरा सामना हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खेळला जात आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल.
संबंधित बातम्या