Carlos Brathwaite Angry Video: कार्लोस ब्रेथवेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फुटेजमध्ये वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेट एका सामन्यात बाद झाल्यानंतर वैतागून आपल्या बॅटने हेल्मेट मारताना दिसत आहे. मॅक्स ६० कॅरेबियन २०२४ स्पर्धेदरम्यान न्यूयॉर्क स्ट्रायकर्स आणि ग्रँड केमन जग्वार यांच्यातील सामन्यादरम्यान हा प्रकार घडला.
क्रिकेट सामन्यादरम्यान जोशुआ लिटलने शॉर्ट बॉल टाकली. हा बॉल कार्लोस ब्रेथवेटच्या खांद्याला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. तरी अंपायरने त्याला बाद ठरवले. ब्रेथवेट ५ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. अंपायरच्या या निर्णयावर संतापलेल्या ब्रेथवेट डगआऊटच्या जवळ गेल्यावर बॅटने आपले हेल्मेट बाऊंड्रीवर पाठवले.
प्रथम फलंदाजी करताना मिचेल ओवेन आणि ब्रँडन मॅकमुलेन यांनी दमदार सुरुवात करून अवघ्या दोन षटकांत ३४ धावांचे योगदान दिले. ओवेनने आपल्या संक्षिप्त डावात चार चौकार ठोकले, तर मॅकमुलेनने एक चौकार आणि दोन षटकार जोडून संघाला आठ बाद १०८ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार थिसारा परेराने अवघ्या सात चेंडूत दोन षटकार मारत १६ धावांचे योगदान दिले. ग्रँड केमन जग्वारकडून जोश लिटल, जेक लिंटट आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
अॅलेक्स हेल्सने २४ चेंडूत ३५ धावा आणि रझाने १६ चेंडूत २७ धावा केल्या असल्या तरी जग्वारसंघाने १० षटकांचा पाठलाग ५ बाद ९६ धावांवर संपुष्टात आणला. क्वालिफायर १ मध्ये ग्रँड केमन जग्वारचा ८ धावांनी पराभव करून न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने मॅक्स ६० केमन आयलँड्सच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून २ षटकांत २ बळी घेणाऱ्या अंश पटेलला सामनावीर घोषित करण्यात आले.
स्ट्रायकर्स नंतर २५ ऑगस्ट रोजी फायनलमध्ये कॅरेबियन टायगर्सशी भिडले. टायगर्सने १० षटकांत ६ बाद १२५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना एनवायएसचा संघ ८.१ षटकांत ६९ धावांवर आटोपला. टायगर्सचा जोश ब्राऊन (१८ चेंडूत ६० धावा) सामनावीर ठरला.