टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याच्याबद्दल खूप बोलले जात आहे. विनोद कांबळी त्याचा बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर याच्यासारखा यशस्वी क्रिकेटपटू का होऊ शकला नाही, यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
कांबळीमध्ये क्रिकेट टॅलेंटची कमतरता नव्हती. मात्र, तो सचिनऐवढा यशस्वी होऊ शकला नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत, जी कदाचित आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेदना देत असणार. विशेष म्हणजे, विनोद कांबळी हाही त्यातला एक भाग होता.
१९९६ च्या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारतीय चाहत्यांसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता.
कारण भारताचा पराभव पाहून चाहते इतके संतापले की त्यांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि स्टँडमधील एका भागाला आग लावली. परिस्थिती अत्यंत वाईट होत असल्याचे पाहून सामना रद्द करण्यात आला आणि श्रीलंकेला विजेता घोषित करण्यात आले. त्या सामन्याबाबत भारतीय खेळाडूही निराश झाले होते. विनोद कांबळी प्लेइंग इलेव्हनचा भाग होता.
१३ मार्च १९९६ रोजी विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत ८ विकेट गमावून २५१ धावा केल्या. श्रीलंकेकडून अरविंदा डी सिल्वाने सर्वाधिक ६६ धावा केल्या.
रोशन महानमाने ५८ धावांची चांगली खेळी केली. कर्णधार अर्जुन रणतुंगाने ३५ धावा केल्या. तर भारताकडून जवागल श्रीनाथने सर्वाधिक ३ बळी घेतले. सचिन तेंडुलकरला २ बळी मिळाले.
२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. सामना रद्द करण्यापूर्वी भारताने ३४.१ षटकात ८ विकेट गमावत १२० धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर (६५ धावा) शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला काही करता आले नव्हते. विनोद कांबळी १० धावा करून नाबाद परतला. तो तंबूत परतत असताना तो रडत होता. श्रीलंकेकडून सनथ जयसूर्याने ३ बळी घेतले.
संबंधित बातम्या