माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. विनोद कांबळीची मानसिक आणि शारिरीक स्थिती सध्या बरी नसल्याचे समोर आले आहे. या कारणाने भारतीय क्रिकेटविश्वातून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनीही कांबळीबाबत चिंता व्यक्त करत त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
विनोद कांबळी माझ्या मुलाप्रमाणे असून त्याला त्याच्या पायावर उभ करण्यासाठी सर्वप्रकारची मदत करणार असल्याचे गावस्कर यांनी सांगितले. सुनील गावस्कर सध्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात असून ते तेथे कॉमेंट्री करत आहेत. या कसोटीदरम्यान त्यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.
ते पुढे म्हणाले की, १९८३ चा संघ टीम इंडियाच्या युवा खेळाडूंबाबत खूप जागरूक आहे. आमच्यासाठी ते नातवंडांसारखे आहेत. त्यांचं वय पाहिलं तर काही जण मुलांसारखे असतात. आम्हाला विनोद कांबळीची काळजी घ्यायची आहे आणि त्याला पुन्हा त्याच्या पायांवर उभे राहण्यास मदत करायची आहे. आपण कसे करू, हे आपण भविष्यात पाहू. आम्ही अशा क्रिकेटपटूंची काळजी घेऊ इच्छितो जे संघर्ष करत आहेत."
वास्तविक, काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दिवंगत गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण झाले. त्या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकाच मंचावर एकत्र आले होते. दोघेही एकाच वयाचे असूनही त्यांची देहबोली, बोलण्याची पद्धत आणि राहणीमानात बराच फरक दिसत होता.
या कार्यक्रमाचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांबळीच्या तब्येतीची चिंता वाढली आहे. व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये कांबळी पहिल्यांदा सचिन तेंडुलकरचा हात पकडून त्याला जवळ बसण्यास सांगत होता. पण सचिनला तसे करता आले नाही.
तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कांबळी बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे गाताना दिसला, ज्यात त्याला बोलण्यात अडचणी येत असल्याचे दिसत आहे. या ताज्या व्हिडिओंमुळे कांबळीबाबतची चिंता वाढली आहे.
या व्हिडीओनंतर कपिल देव आणि १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू कांबळीला मदत करणार असल्याचे समोर आले. पण कपिल देव यांनी त्यासाठी एक अट ठेवली. ती म्हणजे, सर्वप्रथम कांबळीने स्वत: रिहॅब सेंटरमध्ये जावे. मग पुढची सर्व मदत आम्ही करू, असे कपिल देव यांनी सांगितले होते.
आता गावस्करांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कांबळीसारख्या खेळाडूंना आपला मुलगा म्हणून संबोधत गावस्कर म्हणाले की, अलीकडच्या काळात आरोग्याच्या गंभीर समस्येशी झुंजणाऱ्या कांबळीची काळजी घेण्यासाठी १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य एकत्र येतील.
संबंधित बातम्या