Vinod Kambli on Sachin Tendulkar : विनोद कांबळी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कांबळीची प्रकृती बरीच सुधारली आहे, मात्र त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला नाही. वैद्यकीय तपासणी अहवालात कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या असल्याचे आढळून आले होते.
आता रुग्णालयात असताना त्याने आपला मित्र सचिन तेंडुलकर याचे आभार मानले आहेत. सचिनचा पाठिंबा आणि आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि राहतील, असे कांबळीने म्हटले आहे.
मीडिया एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळी म्हणाला, "मला पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. मी क्रिकेट कधीच सोडणार नाही कारण मला माहित आहे की मी किती शतके आणि द्विशतके केली आहेत. आमच्या कुटुंबात तीन डावखुरे खेळाडू आहेत. कारण माझा मुलगाही डाव्या हाताने खेळतो.
सोबतच सचिन तेंडुलकरचे आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याचे विनोद कांबळी याने सांगितले. तसेच, जानेवारी २०१९ मध्ये निधन झालेले त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचीही कांबळीने आठवण काढली. कांबळीने सांगितले की, प्रशिक्षक आचरेकर यांचाही माझ्या आणि सचिनच्या मैत्रीत योगदान होते.
विनोद कांबळी याने यापूर्वी युरिन इन्फेक्शनची तक्रार केली होती. मात्र रुग्णालयात तपासणी केली असता त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे आढळून आले. कांबळी याने स्वतः सांगितले की, आता त्याची प्रकृती ठीक आहे. आणि येत्या २-३ दिवसांत डिस्चार्ज मिळेल.
दरम्यान, त्याचा एक मित्र मार्कस काउटो यांनीही कांबळीची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगितले आहे. कांबळीची किमान महिनाभर काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी रुग्णालयाला केली होती.
संबंधित बातम्या