Vinod Kambli Help By Maharashtra Government : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी याला महाराष्ट्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी भारतीय क्रिकेटपटू कांबळीला आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळीकडे बीसीसीआयच्या पेन्शनशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही. अशा परिस्थितीत कांबळीसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांबळीला ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माजी क्रिकेटपटू कांबळीला ५ लाखांची मदत जाहीर केली. विनोद कांबळी याला श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाख रुपये मिळणार आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जाऊन कांबळीची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, वानरसेना संस्थेकडून कांबळीला २५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. वानरसेना संस्थेकडून २५ आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून ५ लाख रुपये, अशा प्रकारे ३० लाख रुपयांची आर्थिक मदत विनोद कांबळीच्या पत्नीच्या खात्यात जमा होणार आहे.
प्रताप सरनाईक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनीही विनोद कांबळी याची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मंगेश चिवटे यांनी कांबळीच्या उपचारात कोणतीही कसूर ठेवू नये, अशी विनंती डॉक्टरांना केली.
याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच कांबळीची आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार असून त्यांना सपोर्ट देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी कांबळीला सांगितले.
दरम्यान, विनोद कांबळी याची प्रकृती खालावल्याने त्याला शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कांबळीला स्नायू दुखणे आणि चक्कर येणे असा त्रास होत होता. ठाण्यातील आकृती रुग्णालयात कांबळीवर उपचार करत असलेले डॉ.विवेक द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले की, कांबळीची मानसिक स्थिती स्थिर नाही.
कांबळीने भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या २१ डावांमध्ये त्याने ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या. या काळात कांबळीने ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या २२७ धावांची होती. याशिवाय, एकदिवसीय सामन्याच्या ९७ डावांमध्ये, कांबळीने ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या, ज्यात २ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या