एकेकाळी भारतीय क्रिकेटचा चमकता तारा असलेल्या विनोद कांबळी याचे नाव अनेक वर्षांनंतर चर्चेत आले आहे. पण याचे कारण क्रिकेट नाही तर वेगळेच आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या वांद्रे पश्चिम येथील विनोद कांबळीचा कोट्यवधी रूपये किमतीचा आलिशान फ्लॅट आज वादात आणि अडचणींत सापडला आहे.
आपल्या शानदार कारकिर्दीसाठी आणि लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखला जाणारा कांबळी आता स्वतःच्या घराचे कर्ज फेडण्यासाठी आणि घराची देखभाल करण्यास सध्या असमर्थ आहे.
त्याच्या घराच्या भिंतींवरील सचिन तेंडुलकरसोबतची त्याची छायाचित्रे त्याला एका सुवर्णकाळाची आठवण करून देतात, पण आज त्याची आर्थिक परिस्थिती आणि वाईट प्रकृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील ज्वेल टॉवर अपार्टमेंटमध्ये असलेला 3-BHK फ्लॅट, ज्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे, तो चर्चेचा विषय बनला आहे. कांबळीचा हा फ्लॅट त्याच्या भव्य रचना आणि सुंदर इंटीरियरसाठी ओळखला जातो.
या फ्लॅटमध्ये एक ओपन-स्टाईल किचन, एक मोठा लिव्हिंग आणि ड्रॉईंग रूम आहे. सोबतच त्याची पत्नी अँड्रिया हेविट हिच्या पोर्ट्रेटसह सुशोभित केलेली भिंत समाविष्ट आहे. कांबळीने २०१२ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यानंतर तो आपल्या घरी मोठ्या प्रमाणावर ख्रिसमस साजरा करत असे.
त्याच्या घराच्या भिंतींवर त्याचा बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरसोबतची छायाचित्रे आहेत, ज्यात त्यांची घट्ट मैत्री दिसून येते.
मात्र, विनोद कांबळीची सध्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. कांबळी याच्याकडे १०.५ लाख रुपये देखभाल शुल्क थकलेले आहे, ज्यासाठी २०१३ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याशिवाय त्याने घर आणि कारचे कर्जही फेडले नाही, ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या.
कांबळीने २०१० मध्ये हे घर घेतले होते तेव्हा त्याची किंमत २ कोटी रुपये होती, ज्यासाठी कांबळीने DNS बँकेकडून सुमारे ५५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते पण, आता आर्थिक परिस्थितीमुळे कांबळी घराचा हप्ताही फेडू शकत नाहीत.
तसेच, EMI न भरल्यामुळे कांबळीला बँकेकडून कॉल देखील येतात, ज्याला ते प्रतिसाद देत नाही. कांबळीच्या या सवयीला कंटाळून डीएनएस बँकेने पेपरमध्ये जाहिरात दिली, ज्यामध्ये कांबळी आणि त्यांच्या पत्नीला डिफॉल्टर घोषित करण्यात आले. कर्ज न भरल्याने कांबळी यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात सुमारे १५ गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे.
बीसीसीआयकडून मासिक ३० हजार रुपये पेन्शन हेच त्याच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. दारूच्या व्यसनामुळे त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे तो १४ वेळा रिहॅब सेंटरमध्ये गेला आहे. त्याची एकूण संपत्ती १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती, परंतु २०२२ पर्यंत त्यांचे उत्पन्न ४ लाख रुपयांपर्यंत घसरले.
कांबळीने निवृत्तीनंतर “खेल भारती स्पोर्ट्स अकादमी” ही क्रिकेट अकादमी सुरू केली आणि बीकेसी, मुंबई येथे प्रशिक्षक म्हणूनही काम केले.
पण असे असूनही त्याचे आर्थिक प्रश्न सुटू शकले नाहीत. जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे महत्त्वाचे आहे याची प्रेरणा आणि चेतावणी देणारी ही त्याची कथा आहे. आज त्याची बिघडलेली तब्येत आणि आर्थिक परिस्थिती त्याच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय आहे.
संबंधित बातम्या