सचिन रमेश तेंडुलकर... शिस्त आणि कठोर परिश्रमातून धन, प्रसिद्धी आणि क्रिकेटचा देव बनला. तर विनोद गणपत कांबळी... वाईट सवयी आणि वाईट संगतीमुळे एक असहाय व्यक्ती बनला आहे. हे केवळ नशीबाचे फळ नाही. तर सचिनचे यश आणि कांबळीचे अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
कारण, एकाच गुरूकडून दोघांनी क्रिकेटचे धडे घेतले. एकाच वेळी करिअरला सुरुवात केली. दोघांचे वयही अंदाजे सारखेच आहे (दीड वर्षाचा फरक आहे). पण सध्या सचिन लाखो हृदयांवर राज्य करतो. तो लाखो तरुणांचा हिरो आणि प्रेरणा आहे.
तर कांबळी तरुण वयात म्हातारा झाल्याचे दिसत आहे. पूर्णपणे असहाय्य दिसत आहे. प्रतिभा कशी वाया जाऊ शकते, याचे तो एक भितीदायक उदाहरण आहे.
शिवाजी पार्कमध्ये दिवंगत गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण झाले. त्या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरही आला होता आणि त्याचा बालपणीचा मित्र विनोद कांबळीलाही बोलावण्यात आलं होतं. एकाच वयाचे असूनही त्यांची देहबोली, बोलण्याची पद्धत आणि राहणीमानात बराच फरक होता.
सचिन आजही क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना दिसतो, तर दुसरीकडे विनोद कांबळी याला एखाद्या कोचची नोकरी तरी द्यावी, असे कुणाला वाटत नाही. त्याच्या वाईट सवयींमुळे त्याने सर्वस्व गमावले आहे.
या स्मारक अनावरण कार्यक्रमाचे अनावरण झाले, त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. यातील व्हिडिओमध्ये सचिन कार्यक्रमाच्या आधी आणि नंतरही आपल्या मित्राला भेटताना दिसत आहे. कदाचित त्याने त्याच्या आरोग्याबद्दल विचारले असावे.
विनोद कांबळीला सचिनने त्याच्या जवळ बसावे असे वाटत होते, कदाचित सचिनलाही तेच हवे होते, पण तो तसे करू शकला नाही. या कार्यक्रमात कांबळी मोठ्या कष्टाने बोलू शकला. त्याला पाहिल्यानंतर, त्याच्या वाईट सवयी आणि व्यसनाधीनतेमुळे त्याला आलेली असहायता आणि आजारपण जाणवत होते.
एक काळ असा होता की क्रिकेट जगतात या दोन मुलांची नावं धुमाकूळ घालत होती. शालेय क्रिकेटमध्ये २४ फेब्रुवारी १९८८ साली शारदाश्रम विद्यामंदिरकडून खेळताना दोघांनी सेंट झेवियर्सविरुद्ध ६६४ धावांची भागीदारी केली.
१६ वर्षीय विनोद कांबळीच्या नावावर नाबाद ३४९ धावा होत्या तर १४ वर्षीय सचिनच्या नावावर नाबाद ३२६ धावा होत्या. यानंतर या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केले.
त्यानंतर ते दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र खेळले, पण अचानक असे काय घडले की विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द ढासळू लागली, तर दुसरीकडे सचिन धूमकेतू बनून क्रिकेटच्या जगावर अधिराज्य गाजवत गेला.
फलंदाजीतील दिग्गज डॉन ब्रॅडमन, सुनील गावस्कर आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी सचिनची तुलना झाली. तर विनोद कांबळी अंमली पदार्थांचे व्यसन आणि वाईट सवयींच्या आहारी गेला.
विशेष म्हणजे, त्यावेळी क्रिकेटमध्ये इतका पैसाही नव्हता. भारतीय क्रिकेट बोर्डही तेवढे श्रीमंत नव्हते. त्यावेळी आयपीएलसारखी लीगही नव्हती, जी खेळाडूंना पोतंभर पैसा देते. मग विनोद कांबळी नेमका चुकला कुठे आणि रस्ता भटकला कसा, हा प्रश्न आहे.
सोबतच, विनोद कांबळी हा त्याचा मित्र सचिनपेक्षा जास्त प्रतिभावान होता, असेही काही लोक म्हणतात. त्याच्या कारकिर्दीत प्रगती झाली असती तर त्याने क्रिकेटवर राज्य केले असते. डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपाने भारताला स्टार मिळाला होता, पण पुढे काहीच घडले नाही. कारण जसे कर्म तसे फळ मिळते. देवाने दिलेली प्रतिभा असूनही विनोद कांबळी दारूच्या नशेत बरबादीच्या दिशेने जात होता. त्याला खूप काही मिळवायचे होते, पण तो दिवसेंदिवस गमावतच राहिला.
तर दुसरीकडे, सचिनने कठोर परिश्रम आणि कठोर शिस्तीने अशी एक स्क्रिप्ट लिहिली, जी प्रत्येक मुलाला पुढील हजारो वर्षे वाचावीशी वाटेल. त्याचे पात्र साकारायला आवडेल.
संबंधित बातम्या