Vino टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कांबळीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
मद्यपानाच्या आहारी गेलेला कांबळी आरोग्याशी संबंधित अनेक त्रासांचा सामना करत आहे. त्याला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. कांबळी अलीकडंच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमात त्याची भेट बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर याच्याशी झाली. या भेटीची बरीच चर्चा झाली.
या कार्यक्रमात बोलताना कांबळी यांचे शब्दही अडखळत होते. त्याच्या या स्थितीबद्दल अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी चिंता व्यक्त केली होती. विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी कांबळीच्या परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त करत त्याला बाहेरच्या मदतीबरोबरच स्वमदतीची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. कपिल देव यांच्या मताला प्रतिसाद देत कांबळीनं पुन्हा फिट होण्याचा निर्धारही व्यक्त केला होता.
मात्र आता पुन्हा कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्याला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे.
डावखुरा फलंदाज असलेल्या विनोद कांबळी यानं एकेकाळी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय मैदाना गाजवलं होतं. मात्र स्पर्धेच्या जगात तो मैदानाबाहेर फेकला गेला. गेल्या काही वर्षांपासून तो आरोग्याच्या अनेक अडचणींशी झुंज देत आहे. २०१२ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. २०१३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला. दारूच्या व्यसनाचा त्याच्या आरोग्यावर कमालीचा परिणाम झाला आहे.
अलीकडंच त्यानं स्वत: त्याच्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्याला लघवीचा त्रास होत असल्याचं त्यानं सांगतिलं होतं. माझी बायको आणि मुलांनी माझी खूप काळजी घेतली. महिनाभरापूर्वी चक्कर येऊन मी पडलो होतो. डॉक्टरानी मला अॅडमिट व्हायला सांगितलं होतं, असं त्यानं एका यूट्यूब चॅनेलला सांगितलं होतं.
संबंधित बातम्या