विनोद कांबळी अलीकडेच सचिनसोबत त्यांच्या बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात दिसला होता. तेव्हापासून त्याच्या प्रकृतीबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव याने १९८३ च्या विश्वचषक विजेत्या सहकाऱ्यांसह कांबळीला रिहॅबसाठी मदतीची ऑफर दिली.
आता पहिल्यांदाच कांबळीने त्याची तब्येत, सचिनसोबतचे नाते आणि रिहॅबबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपली प्रकृती आणि आर्थिक परिस्थितीही उघड केली.
५२ वर्षीय विनोद कांबळी याने नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली आहे. यादरम्यान त्याने कपिल देव यची ऑफर स्वीकारली आणि त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कांबळी म्हणाला, 'मी पुनर्वसनासाठी तयार आहे. मला जायचे आहे कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे.' याचा अर्थ तो १५व्यांदा रिहॅबसाठी तयार आहे.
यापूर्वी त्याच्या जवळच्या मित्राने सांगितले होते की, कांबळी १४ वेळा रिहॅबसाठी गेला होता. कपिल देव यांनी त्याला मदत करण्यापूर्वी त्याने स्वत: यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अट घातली होती.
कांबळीने सांगितले की, त्याला युरिन इन्फेक्शनचा गंभीर त्रास आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात तो बेशुद्ध झाला होता, आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. कांबळीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी मिळून त्याची काळजी घेतात आणि आजारातून बरे होण्यास मदत करत आहेत.
कांबळीने आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचा खुलासाही केला. बीसीसीआयकडून मिळणारे पेन्शन हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे, जिथून तो दरमहा ३० हजार रुपये कमावतो.
विनोद कांबळी याने २००९ मध्ये सचिनबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याने आपल्या बालपणीच्या मित्रावर मदत न केल्याचा आरोप केला होता. यानंतर दोघांमधील संवादही थांबल्याचे मानले जात आहे. २०१३ मध्ये सचिनने निवृत्तीच्या वेळी आपल्या निरोपाच्या भाषणात कांबळीचा उल्लेखही केला नव्हता.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दोघे भेटले तेव्हा त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. कांबळी १५ वर्षांनंतर आता त्या वादावर बोलला आहे.
मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, तेव्हा मी खूप निराश झालो होतो. म्हणूनच मी ती गोष्ट बोललो. सचिनने पुरेशी मदत केली नाही असे त्याला वाटले. कांबळीने खुलासा केला की, २०१३ मध्ये सचिनने त्याच्या दोन शस्त्रक्रियांसाठी पैसे दिले होते. तो म्हणाला की तो वारंवार अपयशी व्हायचा पण सचिन त्याला मदत करायचा.
यामुळे तो ९ वेळा संघात पुनरागमन करू शकला. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे असे कांबळीने सांगितले आणि त्याने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
संबंधित बातम्या