UP Squad Vijay Hazare Trophy 2024 : भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहोचणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२४-२१ डिसेंबरपासून आंध्र प्रदेशमध्ये सुरू होत आहे आणि ही स्पर्धा १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या दरम्यान, रिंकू सिंग याच्याकडे उत्तर प्रदेश संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
विजय हजारे ट्रॉफी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. यासाठी यूपीचा १९ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
रिंकू सिंगबद्दल बोलायचे झाले तर तो आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळताना दिसणार आहे. पण त्याआधी, त्याला यूपीचे कर्णधारपद मिळणे हे त्याला केकेआरचे कर्णधारपद मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची रणनीती अवलंबली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये आर्यन जुयाल, तर भुवनेश्वर कुमारने त्याच्या नेतृत्वाखाली यूपी टी-20 संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले होते.
आता वनडे संघाची कमान रिंकू सिंगकडे सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशला त्यांच्या इतिहासात फक्त एकदाच विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद जिंकता आले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जे खेळाडू खेळत होते, त्याच खेळाडूंचा विजय हजारे ट्रॉफीसाठी यूपी संघात समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार सोबतच नितीश राणा, करण शर्मा, प्रियम गर्ग, मोहसिन खान आणि शिवम मावी हे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यूपीच्या संघात होते. रिंकून आताच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये ८ सामने खेळताना २७७ धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफीसाठी यूपीचा संघ: रिंकू सिंग (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, माधव कौशिक, करण शर्मा, प्रियम गर्ग, नितीश राणा, अभिषेक गोस्वामी, आकाशदीप नाथ, आर्यन जुयाल, आराध्या यादव, सौरभ कुमार, कृतज्ञ कुमार सिंग, विपराज , मोहसीन खान, शिवम मावी, आकिब खान, अटल बिहारी राय, कार्तिकेय जैस्वाल, विनीत पनवार.