उदयोन्मुख स्टार अग्नी चोप्रा याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत सलग दोन द्विशतके झळकावली आहेत. अग्नी चोप्रा हा प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा आहे. २५ वर्षीय अग्नी हा मिझोरमकडून रणजी ट्रॉफी खेळतो. त्याने रणजी ट्रॉफी प्लेट २०२४/२५ च्या तिसऱ्या फेरीत मणिपूरविरुद्ध २१८ धावांची खेळी खेळली.
अग्नी चोप्राने या खेळीत २६९ चेंडूंत २९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २१८ धावा केल्या. त्याच्या द्विशतकामुळे मिझोरामला मणिपूरविरुद्धच्या पहिल्या डावात ५३६ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. यष्टिरक्षक जेहू अँडरसन, मोहित जांगरा आणि विकास कुमार यांनीही आपल्या संघासाठी अर्धशतके झळकावली.
विशेष म्हणजे, अग्नी चोप्राचे हे रणजी ट्रॉफीमधील सलग दुसरे द्विशतक आहे. यापूर्वी त्याने दुसऱ्या फेरीत अरुणाचल प्रदेशविरुद्ध शतक आणि द्विशतक झळकावले होते. त्याच्या ११० आणि २३८ धावांच्या स्फोटक खेळीमुळे मिझोरामचा २६७ धावांनी विजय झाला होता.
अग्नी चोप्रा हा प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा आहे. विधु विनोद चोप्रा यांनी मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाई, ३ इडियट्स आणि पीके सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
अग्नी चोप्रा हा देशांतर्गत सर्किटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. मिझोरामकडून खेळणाऱ्या अग्नि चोप्राने आतापर्यंत १७ फर्स्ट क्लास इनिंग्समध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने १०२.४७ च्या सरासरीने १५३७ धावा केल्या आहेत. या दरम्यान , त्याने ८ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २३८* धावा आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अग्नीने जानेवारी २०२४ मध्येच प्रथम श्रेणीत पदार्पण केले.
संबंधित बातम्या