बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग मानली जाते. या मैदानावर फलंदाज धावांचा पाऊस पाडतात. तसेच, या मैदानावर भरपूर चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, या सामन्यातच कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२४ चा सर्वात लांब षटकार ठोकला. डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरने मयंक डागरच्या चेंडूवर १०६ मीटर लांब षटकार ठोकला. अय्यरने ९व्या षटकातील चौथा चेंडू मिडविकेटच्या वरून स्टेडियमच्या बाहेर पाठवला.
या आधी इशान किशनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १०३ मीटर लांब षटकार ठोकला होता.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून वेंकटेश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. संथ मानल्या जाणाऱ्या या खेळपट्टीवर त्याने आपल्या इच्छेनुसार शॉट्स खेळले. त्याने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. अय्यरच्या बॅटमधून ३ चौकारांसह ४ षटकार आले. त्याने अल्झारी जोसेफच्या एकाच षटकात दोन षटकार आणि दोन चौकार मारले.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ६ बाद १८२ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ८३ धावांची नाबाद खेळी केली. यानंतर KKR ने १९ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. व्यंकटेश अय्यरशिवाय सलामीवीर सुनील नरेनने अवघ्या २२ चेंडूत ४७ धावांची तुफानी खेळी केली.
संबंधित बातम्या