भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 मध्ये वरुण चक्रवर्ती याची अप्रतिम फिरकी पाहायला मिळाली. आपल्या दुसऱ्याच षटकात या मिस्ट्री स्पिनरने एक नव्हे तर दोन इंग्लिश फलंदाजांना क्लीन बोल्ड केले.
चक्रवर्तीने प्रथम हॅरी ब्रूकचा स्टंप उखडला आणि नंतर शुन्यावर नवीन फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन याला क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे ८ षटकांत इंग्लंडची धावसंख्या ६५/४ अशी झाली. वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २३ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले.
कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर बुधवारी रात्री ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीला पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागली कारण भारत अर्शदीप सिंग या एकमेव मुख्य वेगवान गोलंदाजासह सामन्यात उतरला. संघात अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिष्णोई या ३ फिरकी गोलंदाजांचा समावेश होता.
आठव्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला तेव्हा पहिला चेंडू डॉट होता, पण दुसऱ्या चेंडूवर हॅरी ब्रूकने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर चक्रवर्तीने गुगली टाकली, बरीच टर्न झाली. ब्रुक या चेंडूला ऑफ साइडच्या दिशेने शॉर्ट कव्हर्सकडे ढकलण्यासाठी गेला, पण चेंडू वळून आत आला आणि लेग आणि मिडल स्टंपवर आदळला. तो १७ धावा करून बाद झाला.
नवीन फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने चौथ्या चेंडूवर डॉट खेळला आणि पाचव्या चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. वरुण चक्रवर्तीला दुसरी विकेट मिळाली. लियाम लिव्हिंगस्टन शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. लिव्हिंगस्टोननेही कव्हर्सच्या दिशेने फटका मारायचा प्रयत्न केला. अशा स्थितीत चक्रवर्तीने संथ गुगली टाकली, हा चेंडू लिव्हिंगस्टोनला समजला नाही, तो बीट झाला आणि चेंडू स्टंपवर आदळला. अशाप्रकारे इंग्लंडने अवघ्या ६५ धावांत ४ फलंदाज गमावले.
संबंधित बातम्या