भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने एका नव्या क्रिकेट लीगमधील संघासोबत करार केला आहे. रैना अमेरिकेतील ह्यूस्टन येथे सुरू होणाऱ्या US मास्टर्स T10 स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे सीझन असणार आहे.
शिकागो प्लेयर्स या संघात रैनाचा समावेश करण्यात आला आहे. ही लीग ८ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. दुसऱ्या सीझनपूर्वी शिकागो प्लेयर्स संघाने रैनाचा समावेश करून ट्रॉफीवरचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे.
रैना सोबतच माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू इसुरु उडाना हे आधीच संघाचा भाग आहेत.
शिकागो प्लेयर्समध्ये सामील झाल्याबद्दल सुरेश रैना म्हणाला, की शिकागो प्लेयर्सचा एक भाग बनून मी रोमांचित आहे आणि यूएस मास्टर्स T10 सारख्या लीगमध्ये फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करणे हा एक मोठा सन्मान आहे.
T10 हा खेळ T20 पेक्षाही वेगवान आहे आणि मी त्याचा खूप आनंद घेण्याचा प्रयत्न करेन. मला विश्वास आहे की आमचा संघ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील क्रिकेट चाहत्यांचे उत्तम मनोरंजन करेल".
शिकागो प्लेयर्स संघात न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज जेसी रायडर, भारतीय क्रिकेटपटू गुरकीरत सिंग, ईश्वर पांडे आणि अनुरीत सिंग हेही आहेत. यूएस मास्टर्स T10 सीझन २ टेक्सासमध्ये ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान खेळवला जाईल. त्यामुळे लवकरच क्रिकेटचे सर्व दिग्गज अमेरिकेत दिसणार आहेत.
यूएस मास्टर्स T10 चा पहिला सीझन १८ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२३ दरम्यान फ्लोरिडामध्ये खेळला गेला, ज्यामध्ये टेक्सास चार्जर्सने अंतिम फेरीत न्यूयॉर्क वॉरियर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
शिकागो प्लेयर्सचा संपूर्ण संघ: सुरेश रैना, पार्थिव पटेल, इसुरु उडाना, अनुरीत सिंग, केन्नर लुईस, गुरकीरत मान, पवन नेगी, ईश्वर पांडे, जेसी रायडर, विल्यम पार्किन्स, अनुरीत सिंग, शुभम रांजणे, जेसल कारिया, अभिमन्यू मिथुन.