Urvil Patel : अनसोल्ड उर्विल पटेलनं सर्वात महागड्या ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला, अवघ्या २८ चेंडूत ठोकलं शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Urvil Patel : अनसोल्ड उर्विल पटेलनं सर्वात महागड्या ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला, अवघ्या २८ चेंडूत ठोकलं शतक

Urvil Patel : अनसोल्ड उर्विल पटेलनं सर्वात महागड्या ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला, अवघ्या २८ चेंडूत ठोकलं शतक

Nov 27, 2024 02:51 PM IST

गुजरातचा फलंदाज उर्विल पटेल याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३५ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी करत ऋषभ पंतचा मोठा विक्रम मोडला. त्याने २८ चेंडूत शतक पूर्ण केले. मात्र नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात तो अनसोल्ड राहिला आहे.

Urvil Patel : अनसोल्ड उर्विल पटेलनं सर्वात महागड्या ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला, अवघ्या २८ चेंडूत ठोकलं शतक
Urvil Patel : अनसोल्ड उर्विल पटेलनं सर्वात महागड्या ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला, अवघ्या २८ चेंडूत ठोकलं शतक (Instagram)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ मध्ये आज (२७ नोव्हेंबर) गुजरात आणि त्रिपुरा यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरातच्या उर्विल पटेल याने इतिहास घडवला आहे. उर्विलने अवघ्या २८ चेंडूत शतक ठोकत ऋषभ पंत याचा मोठा विक्रम मोडला आहे.

या वादळी खेळीनंतर उर्विल पटेल हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. गुजरातकडून उर्विल पटेलने ३५ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली, या दरम्यान त्याने अवघ्या २८ चेंडूत शतक पूर्ण केले.

उर्विलचा टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विश्वविक्रम अवघ्या एका चेंडूने हुकला. सर्वात जलद टी-20 शतकाचा विश्वविक्रम साहिल चौहान याच्या नावावर आहे. यावर्षी एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यात झालेल्या सामन्यात साहिल चौहानने अवघ्या २७ चेंडूत शतक झळकावले होते.

विशेष म्हणजे, उर्विल पटेल हा नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे. या मेगा ऑक्शनमध्ये उर्विलला एकही खरेदीदार मिळाला नाही. उर्विल यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचा भाग होता, परंतु यावेळी तो अनसोल्ड राहिला.

यानंतर उर्विलने थेट आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंतचा विक्रम मोडला. पंतने २०१८ मध्ये दिल्लीकडून खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध ३२ चेंडूत शतक झळकावले होते. पंतला यंदाच्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या मेगा लिलावात २७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गुजरात आणि त्रिपुरा यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या. श्रीदाम पॉलने ५७ धावांची खेळी केली.

त्यानंतर गुजरातने अवघ्या १०.२ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. उर्विल व्यतिरिक्त सलामीवीर आर्या देसाईने २४ चेंडूत ३८ धावा केल्या. उर्विलने जवळपास ३२३ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यावेळी त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि १२ षटकार आले.

Whats_app_banner