UP Warriorz vs Royal Challengers Bangalore : महिला प्रीमियर लीगचा ११ वा सामना आज (४ मार्च) यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. बंगळरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर युपीची कर्णधार अलिसा हिलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ ८ बाद १७५ धावाच करू शकला आणि सामना २३ धावांनी गमावला.
युपीकडून केवळ अलिसा हिलीने अर्धशतकी खेळी केली. तिने ३८ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारासंह ५५ धावा केल्या. युपीचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यात सलामीला आलेल्या एस मेघना आणि स्मृती मानधना यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी झाली. मेघनाने २१ चेंडूत २८ धावा केल्या.
अंजली सरवानीने मेघनाला चामरी अटापट्टूकरवी झेलबाद केले. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेली ॲलिस पेरीने वादळी सुरुवात केली. पेरीने मानधनासोबत दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची मोठी भागीदारी केली.
मंधाना ५० चेंडूत ८० धावा करून बाद झाली. तर एलिस पेरीने ३७ चेंडूत ५८ धावांची खेळी खेळली. शेवटी रिचा घोष १० चेंडूत २१ धावा करून नाबाद राहिली आणि संघाची धावसंख्या १९८ पर्यंत पोहचवली.