UPW vs MI Womens Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगचा १४वा सामना आज (७ मार्च) यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरूण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात युपीचा संघ २० षटकात९ बाद ११८ धावाच करू शकला आणि ४२ धावांनी सामना गमावला.
मुंबईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीचे फलंदाज फ्लॉप ठरले. त्यांच्याकडून केवळ दीप्ती शर्माने ३६ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. तर बाकीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले.
WPL 2024 मध्ये मुंबई आणि युपी दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. मागच्या सामन्यात युपीने विजय मिळवला होता. तर मुंबईने त्या पराभवाचा बदला घेत युपीचा मोठा पराभव केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात विशेष झाली नाही. चमारी अटापट्टूने हॅली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांना अगदी स्वस्तात तंबूत पाठवले. मॅथ्यूजने ४ धावा तर यास्तिकाने ९ धावा केल्या.
यानंतर मुंबईसाठी संयमी खेळी खेळणारी नॅट सिव्हर ब्रंट ३५ धावा करून बाद झाली. सिव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांच्यात ५९ धावांची भागीदारी झाली. पण दोघीही एकापाठोपाठ बाद झाल्या. हरमनप्रीतला सायमा ठाकूरने क्लीन बोल्ड केले. तिने ३३ धावा केल्या.
यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या अमेलिया केरने अमनजोत कौरला साथीला घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस अमेलिया केरने ३९ धावांचे योगदान दिले. तिने शेवटी सजीवन सजनासोबत सहाव्या विकेटसाठी ४० हून अधिक धावांची भागीदारी केली. सजना सजीवनने २२ धावा केल्या.
यूपीकडून चमारी अटापट्टूने २ तर राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा आणि सायमा ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.