Up Warriorz vs Delhi Capitals Highlights : महिला प्रीमियर लीग (WPL 2024) मध्ये सोमवारी (२६ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सने पहिला विजय मिळवला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्लीने यूपी वॉरियर्सचा ९ विकेट्सनी पराभव केला. दिल्लीला यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
तर दुसरीकडे, मागील सामन्यात यूपी वॉरियर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाला होता. अशाप्रकारे त्यांना मोसमातील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर यूपीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १४.३ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १२३ धावा करून सामना जिंकला. संघाने ३३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
दिल्लीकडून शेफाली वर्माने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. तिने ४३ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. तर कर्णधार मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ५१ धावा केल्या. तिने ६ चौकार मारले.
शफाली आणि लॅनिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. संघाला एका धावेची गरज असताना कर्णधार लॅनिंग बाद झाली. सोफी एक्लेस्टोनने तिला वृंदा दिनेशकरवी झेलबाद केले. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जने क्रीझवर येऊन चौकार मारून सामना संपवला.
तत्पूर्वी, यूपीकडून श्वेता सेहरावतने सर्वाधिक ४५ धावा केल्या. कर्णधार ॲलिसा हेलीने १३ धावा केल्या. किरम नवगिरे व पूनम खेमनार यांनी प्रत्येकी १० धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनने ६ आणि दीप्ती शर्माने ५ धावा केल्या.
तर दिल्ली कॅपिटल्सकडून राधा यादवने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. मारिजन कॅपने तीन विकेट घेतल्या. ॲनाबेल सदरलँड आणि अरुंधती रेड्डी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.