मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  USA vs PAK Highlights : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, सुपर ओव्हरमध्ये नवख्या अमेरिकेनं उडवला धुव्वा

USA vs PAK Highlights : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, सुपर ओव्हरमध्ये नवख्या अमेरिकेनं उडवला धुव्वा

Jun 07, 2024 08:50 AM IST

Super over USA vs PAK T20 World Cup 2024 : पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात खेळणाऱ्या अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानला दणका दिला आहे. अमेरिकेने सुपर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला.

PAK vs USA T20 World Cup 2024 Super over Highlights
PAK vs USA T20 World Cup 2024 Super over Highlights (PTI)

PAK vs USA T20 World Cup 2024 Super over Highlights : अमेरिकेने गुरूवारी (६ जून) माजी T20 चॅम्पियन पाकिस्तानचा सुपर ओव्हर मध्ये पराभव करून सध्याच्या T20 विश्वचषकातील पहिला आणि सर्वात मोठा उलटफेर केला.

ट्रेंडिंग न्यूज

डलास येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात अमेरिकेने चमकदार कामगिरी करत ३ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा करून सामना बरोबरीत सोडवला.

यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने एका विकेटच्या मोबदल्यात १८ धावा केल्या आणि पाकिस्तानला एक विकेट गमावून केवळ १३ धावा करता आल्या.

T20 विश्वचषकाचा हा निकाल २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात आयर्लंडकडून झालेल्या धक्कादायक पराभवाची आठवण करून देणारा आहे, त्या वर्ल्डकपमध्ये आयर्लंड पहिला विश्वचषक खेळत होता.

सुपर ओव्हरमध्ये काय झाले?

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरला सुपर ओव्हर देण्यात आली. ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंग अमेरिकेसाठी फलंदाजीला आले. तर इफ्तिखार अहमद आणि फखर जमान यांनी पाकिस्तानकडून सुपर ओव्हर खेळली. तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने गोलंदाजी केली.

अमेरिकेची सुपर ओव्हर- मोहम्मद आमिर

०.१: ४ धावा (आरोन जोन्स)

०.२: २ धावा (आरोन जोन्स)

०.३: १ धाव (आरोन जोन्स)

०.४: २ वाइड (हरमीत सिंग)

०.४: १ धाव (आरोन जोन्स)

०.५ :२ वाइड (हरमीत सिंग)

०.५: २ धावा (आरोन जोन्स)

0.६: १ धाव आणि बाद (आरोन जोन्स)

पाकिस्तानची सुपर ओव्हर- सौरभ नेत्रावलकर

0.१ : निर्धाव (इफ्तिखार अहमद)

०.२ :४ (इफ्तिखार अहमद)

0.३ : १ वाइड (इफ्तिखार अहमद)

0.३ : इफ्तिखार अहमद बाद

0.४ :१ वाइड (शादाब खान)

0.४ : ४ लेग बाय (शादाब खान)

0.५ : २ धावा (शादाब खान)

0.६ : १ धाव (शादाब खान)

टाय झालेल्या ४ सामन्यांमधला हा पाकिस्तानचा तिसरा पराभव आहे, (सुपर ओव्हर आणि बॉल आउट) तर अमेरिकेने दोन सुपर ओव्हर खेळल्या आहेत. त्यांनी दोन्ही जिंकल्या आहेत.

अमेरिकेने आतापर्यंत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या दोन संघांना पराभवाचा दणका दिला आहे. पाकिस्तान आधी टी-20 मालिकेत अमेरिकेने बांगलादेशलाही दणका दिला होता.

दरम्यान, T20I मध्ये पूर्ण सदस्य नसलेल्या संघाकडून पाकिस्तानचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यूएसएने कॅनडावर विजय मिळवून टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली.

सामन्यात काय घडलं?

पाकिस्तानकडून बाबर आझम (४४), शादाब खान (४०) हे सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरले. शेवटी शाहीन शाह आफ्रिदी (नाबाद २३) आणि इफ्तिखार अहमद (१८) यांनीही चांगली फलंदाजी केली, त्यामुळे पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

एकवेळ पाकिस्तानच्या ३ विकेट्स अवघ्या २६ धावांवर पडल्या होत्या. इथून पाकिस्तानचा दारुण पराभव होईल असे वाटत होते पण बाबर आझम आणि शादाब खान यांनी संघाला सावरले.

अमेरिकेकडून नॉस्तुश केन्झिगे हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ३ बळी घेतले. तर भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावलकरने २ आणि पाकिस्तानी वंशाच्या अली खानने १ बळी घेतला. भारतीय वंशाच्या जशदीप सिंगलाही एक विकेट मिळाली.

धावांचा पाठलाग करताना १६० धावा करण्यासाठी उतरलेल्या USA संघाला १५९ धावा करता आल्या. संघाकडून कर्णधार मोनांक पटेलने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर ॲड्रियास गॉसने ३५ धावा केल्या. तर आरोन जोन्स (३६), नितीश कुमार (१४) दोघेही नाबाद राहिले.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४