ICC U19 World Cup IND Vs SA semi-final : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आजपासून (६ फेब्रुवारी) उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. पहिला उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे.
दोन्ही संघांमधील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. तर हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्करवर पाहता येईल. तसेच, भारत-आफ्रिका सेमी फायनल सामन्याचे लाईव्ह स्ट्रमिंग हॉटस्टार अॅपवर पाहता येणार आहे.
भारताने या स्पर्धेत सलग ५ विजयांच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ कोणत्याही विशिष्ट खेळाडूवर अवलंबून नसून सर्व खेळाडूंनी गरजेनुसार योगदान दिले आहे.
१८ वर्षीय मुशीर खान या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये दोन शतके आणि एक अर्धशतकांसह ८३.५० च्या सरासरीने ३३४ धावा केल्या आहेत. मुशीर खान हा सर्फराज खानचा धाकटा भाऊ आहे.
भारतीय कर्णधार उदय सहारनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ६१.६० च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३०४ धावा केल्या आहेत.
भारताचा उपकर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू सौम्य कुमार पांडे याने स्पर्धेत आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने २.१७ च्या इकॉनॉमी रेटने १६ बळी घेतले आहेत आणि स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तो तिसरा आहे.
दरम्यान,या स्पर्धेत भारतासोबत आफ्रिकेनेही चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका सध्या चर्चेत आहे. त्याने या स्पर्धेत धारदार गोलंदाजी केली असून आज खरी लढत भारतीय फलंदाज आणि माफाका यांच्यात असणार आहे.
मफाकाने ५ सामन्यांत तीन वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत आणि १८ बळींसह तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. शेवटच्या दोन सामन्यात त्याने एकहाती आफ्रिकेला विजय मिळवून दिला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने यजमान संघाच्या श्रीलंकेविरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात २१ धावांत ६ बळी घेतले होते.
संबंधित बातम्या