IDN vs BAN, U19 WC : भारताच्या २५१ धावा, कर्णधार उदय सहारनचं अर्धशतक, मारुफ मृधाचे ५ विकेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IDN vs BAN, U19 WC : भारताच्या २५१ धावा, कर्णधार उदय सहारनचं अर्धशतक, मारुफ मृधाचे ५ विकेट

IDN vs BAN, U19 WC : भारताच्या २५१ धावा, कर्णधार उदय सहारनचं अर्धशतक, मारुफ मृधाचे ५ विकेट

Jan 20, 2024 05:24 PM IST

Ind vs Ban U19 World Cup 2024 : अंडर-१९ विश्वचषकात भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात भारताने २५१ धावा केल्या आहेत.

india vs ban u19 world cup 2024
india vs ban u19 world cup 2024

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना आज (२० जानेवारी) बांगलादेशविरुद्ध खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी २५२ धावा करायच्या आहेत.

भारताकडून आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी शानदार खेळी केली. सलामीला आलेल्या आदर्शने ७६ धावा केल्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार सहारनने ६४ धावा केल्या. तर गोलंदाजीत बांगलादेशच्या मारूफ मृधाने ५ विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेतील मॅनगॉंग ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकांतच अर्शीन कुलकर्णीच्या रूपाने भारताने पहिली विकेट गमावली. 

यानंतर संघाला ८व्या षटकात दुसरा धक्का बसला. पण त्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि आर्दश सिंग यांनी संघाचा डाव सावरला आणि एकूण २५१ धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने अवघ्या १७ धावांवर पहिली विकेट गमावली, सलामीवीर अर्शीन कुलकर्णी अवघ्या ७ धावा करून बाद झाला. त्यानंतर ८व्या षटकात ३१ धावांवर भारताला दुसरा धक्का मुशीर खानच्या (३) रूपाने बसला. पण इथून दुसरा सलामीवीर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४४ चेंडूत ११६ धावांची भागीदारी केली.

ही मजबूत भागीदारी चौधरी मोहम्मद रिझवानने ३२व्या षटकात मोडली. त्याने आदर्शची विकेट घेतली. आदर्शने ९६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.

यानंतर भारतीय फलंदाजांना कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही. उर्वरित खेळाडूंनी छोटे-छोट्या धावांचे योगदान दिले. आदर्शनंतर कर्णधार सहारन ३९व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. ९४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ६४ धावा करणाऱ्या सहारनला विरोधी संघाचा कर्णधार महफुजुर रहमान रब्बीने बाद केले.

शेवटी सचिन धसने २० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २६ आणि राज लिंबानी नाबाद २ धावा केल्या.

बांगलादेशी गोलंदाजांनी कमाल केली

बांगलादेशकडून मारूफ मृधाने सर्वाधिक ५ बळी घेतले. त्याने ८ षटकात ४३ धावा दिल्या. याशिवाय कर्णधार महफूजुर रहमान रब्बी आणि चौधरी मोहम्मद रिझवान यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या