India U19 vs South Africa U19 World Cup 2024 : अंडर-१९ वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनल सामना आज खेळला गेला. हा सामना जिंकून टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायलमध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान होते.
या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४९व्या षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
या विजयासह टीम इंडियाने नवव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. तर भारत ५ वेळा चॅम्पियन बनला असून तीनदा फायनलमध्ये पराभूत झाला आहे. अंडर १९ वर्ल्डकपची फायनल ११ फेब्रुवारीला होणार आहे.
यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सेमी फायनल उद्या (७ फेब्रुवारी) होणार आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार उदय सहारनने शानदार खेळी केली. २४५ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताने अवघ्या ३२ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या.
यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी शानदार १७१ धावांची भागीदारी केली. पण या दरम्यान सचिन धसचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. तो ९६ धावा करून बाद झाला. त्याने ९५ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार मारला.
सचिन बाद झाल्यानंतर संघाला पुन्हा एकदा गळती लागली. त्यामुळे सहज जिंकता येणारा सामना अतितटीचा झाला. ४९ व्या षटकात उदय बाद झाला. पण पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. २४४ धावांवर त्याची विकेट पडली. तिथून भारताला विजयासाठी फक्त १ धाव करायची होती. राज लिंबानीने चौकार मारून सामना संपवला. उदय सहारनने १२४ चेंडूत ८१ धावा केल्या.
वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जबरदस्त ९६ धावा फटकावणारा सचिन धस बीडचा आहे. त्याचे वडिल संजय धस आरोग्य विभागात कार्यरत आहेत. तर, आई सुरेखा धस या पोलिस अधिकारी आहेत.