महिला अंडर १९ टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. क्वालालंपूर येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत आफ्रिकेला ८२ धावांवर गारद केले. टीम इंडियाला विजयासाठी ८३ धावा कराव्या लागतील.
भारताकडून जी त्रिशाने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय वैष्णवी, आयुषी आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या सामन्यात भारताच्या फिरकीपटूंनी एकूण ९ विकेट घेतल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून मिकी व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक २३ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला फारशी सुरुवात झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात डावखुरी फिरकीपटू पारुनिका सिसोदियाने सिमोन लॉरेन्स हिला (०) बोल्ड केले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या केवळ ११ धावा होती.
त्यानंतर मध्यमगती गोलंदाज शबनम शकीलने दुसरी सलामीवीर जेम्मा बोथा हिला विकेटच्या मागे झेलबाद केले. बोथाने १४ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला २० धावांच्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला, जेव्हा डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्लाने डायरा रामलाकनला (३) बोल्ड केले.
यानंतर गोंगाडी त्रिशा हिने कर्णधार कायला रेनेकेला (७ धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर कॅराबो मॅसिओ (१० धावा) हिला आयुषी शुक्लाने पायचीत केले.
आफ्रिकेने अवघ्या ४४ धावांत ५ फलंदाज गमावल्यानंत माईक व्हॅन वुर्स्ट आणि फे काउलिंग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघींमध्ये सहाव्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी झाली. पण त्यानंतर गोंगडी त्रिशाने एकाच षटकात दोन विकेट घेत दक्षिणेची स्थिती पुन्हा बिकट केली.
त्रिशाने मिकी व्हॅन वुर्स्टला यष्टिचित तर शेषानी नायडूला (०) बोल्ड केले. माइक व्हॅन वुर्स्टने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक २३ धावा केल्या. यानंतर डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने त्याच षटकात फे काउलिंग (१५) आणि मोनालिसा लेगोडी (०) यांचे बळी घेतले. तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर पारुनिका सिसोदियाने ॲश्ले व्हॅन विक (०) हिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
संबंधित बातम्या