U19 Womens World Cup 2025 : अंडर १९ महिला टी20 विश्वचषक २०२५ सुरू झाला आहे. भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. निक्की प्रसाद हिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा सहज पराभव केला.
भारताने हा सामना ९ विकेटने जिंकला. जोशिता व्हीजे, आयुषी शुक्ला आणि सानिका चाळके यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली. त्यांच्यासोबत जी कमलिनी आणि पारुनिका सिसोदिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
या सामन्यात वेस्ट इंडीज अंडर-१९ महिला संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या दरम्यान भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि वेस्ट इंडिजला अवघ्या ४४ धावांत गारद केले. कर्णधार समारा रामनाथ अवघ्या ३ धावा करून बाद झाली. सलामीला आलेली असाबी कलंदर १२ धावा तर केनिका कैसर १५ धावा करून बाद झाली.
आयुषी शुक्लाने टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली. आयुषीने ४ षटकात फक्त ६ धावा देत २ बळी घेतले. तिने १ मेडन ओव्हरही टाकली. सिसोदियाने २.२ षटकात ७ धावा देत ३ बळी घेतले. जोशिथाने २ षटकात ५ धावा देत २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने अवघ्या ४.२ षटकांत सामना जिंकला. त्रिशा आणि जी कमलिनी भारतासाठी सलामीला आल्या. यादरम्यान त्रिशा ४ धावा करून बाद झाली. तर कमलिनीने नाबाद १६ धावा केल्या. तिने ३ चौकार मारले. सानिकाने ११ चेंडूंचा सामना करत नाबाद १८ धावा केल्या. तिनेही ३ चौकार मारले.
टीम इंडियाचा पुढचा सामना मलेशियाशी आहे. हा सामना २१ जानेवारीला होणार आहे. यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना २३ जानेवारीला होणार आहे.
संबंधित बातम्या