Vaibhav Suryavanshi batting : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या मेगा लिलावात कोट्यधीश बनलेल्या १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी यानं १९ वर्षांखालील आशिया चषकात चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन सामन्यात छाप पाडण्यात अपयशी ठरलेल्या वैभवनं सेमीफायनलच्या आधीच्या सामन्यात धुमाकूळ घातला. चौकार, षटकारांची आतषबाजी करत त्यानं अर्धशतक ठोकलं आहे.
वैभव सूर्यवंशीनं केलेल्या ७६ धावांच्या बळावर भारतानं युएईवर १० गडी राखून विजय मिळवला. वैभव हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच शैलीत त्यानं ही खेळी केली. वैभवनं ४६ चेंडूत नाबाद ७६ धावा ठोकल्या. त्यात तीन चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटीत शतक झळकावल्यानंतर वैभवनं मोठी खेळी केली नव्हती. त्याची कसर आज भरून निघाली.
यूएईला १० गडी राखून मात देत भारतानं हा सामना सहज जिंकला. ५०-५० षटकांचा सामना टी-२० शैलीत खेळून भारतानं वेळेपूर्वीच सामना संपवला. भारतानं प्रथम युएईला ४४ षटकांत १३७ धावांत ऑलआऊट केलं आणि त्यानंतर अवघ्या १६.१ षटकांत १४३ धावा करून सामना जिंकला. या विजयासह भारतानं सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची उपांत्य फेरी ६ डिसेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघ पाकिस्तान, युएई आणि जपानसह गटात होता. भारत आणि पाकिस्ताननं अ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंकेच्या, तर पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेनं एकही सामना न हरता उपांत्य फेरी गाठली आहे. श्रीलंकेनं बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळला पराभूत केलं, तर पाकिस्तानने भारत, युएई आणि जपानला पराभूत केलं आहे. सेमीफायनलमध्ये कोणते संघ बाजी मारतात यावर अंतिम सामना भारत-पाकिस्तानमध्ये होणार की अन्य संघांत ते स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या